राष्ट्रवादीचे नेते अडकले ट्राफिकमध्ये ! गजबजलेल्या चौकात एकही वाहतूक पोलीस…

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेवगाव शहरात सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका आज रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रतापराव ढाकणे यांना बसला. ढाकणे यांचे वाहन सुमारे वीस मिनिटे वाहतूक कोंडीत अडकले होते.

तरीही वाहतूक सुरळीत होत नव्हती, त्यामुळे ढाकणे यांनी वाहनातून खाली येऊन कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत केली. ही घटना साडेतीन वाजल्याच्या सुमारास शहरातील आंबेडकर चौकात घडली.

श्री. ढाकणे हे एका विवाह समारंभासाठी पाथर्डीवरून शेवगाव मार्गे सामनगाव येथे चालले होते, त्यावेळी त्यांचे वाहन आंबेडकर चौकात वाहतूक कोंडीत सापडले. पंधरा ते वीस मिनिटे झाल्यावरही वाहतूक सुरळीत का होत नाही,

हे पाहण्यासाठी ते वाहनाच्या खाली उतरले तेव्हा आंबेडकर चौकात एक रिक्षाचालक रस्त्यात रिक्षा उभी करून कुठेतरी गेला होता, त्या रिक्षाच्या मागे एक बस होती, त्या बसला रस्ता नव्हता म्हणून ही वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले,

अत्यंत गजबजलेल्या या चौकात एकही वाहतूक पोलीस नव्हता, श्री. ढाकणे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जाऊन वाहतुकीला अडथळा असलेली रिक्षा ढकलत बाजूला नेल्यांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

शहरात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच झालेली आहे. आंबेडकर चौक, क्रांती चौक, या परिसरात वाहतुकीचे नेहमीच कोंडी होत असते, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केलेले असते मात्र, हे वाहतूक पोलीस कधीच त्या ठिकाणी हजर राहत नाहीत.

रविवारी शेवगावचा आठवडे बाजार असतो, त्यातच विवाहाची तिथी असल्यामुळे वाहनांची मोठी गर्दी होते, परंतू वाहतूक पोलीस हजर नव्हते, त्यामुळे ढाकणे यांनी पोलीस निरीक्षकांना फोन करून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे गाजत आहे, त्या संदर्भात सर्वे व तरतूद केल्याचेही सांगितले जाते. मात्र, हे कधी अंमलात येईल, याची नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe