शेतकरी कुटुंब असेल तर शेतकरी बऱ्याचदा शेतामध्ये गव्हाची लागवड करतात व गव्हाची काढणी झाल्यानंतर घराला वर्षभर पुरेल इतका गहू घरी साठवतात व बाकीचा बाजारपेठेत विकतात. तसेच ज्या व्यक्तींकडे शेती नसते असे नोकरीपेशा किंवा शहरांमध्ये राहणारे लोक देखील वर्षभर पुरेल इतका धान्याचा साठा करत असतात.
परंतु बऱ्याचदा जेव्हा गहू, बाजरी किंवा इतर धान्य आपण साठवतो तेव्हा त्याला बऱ्याचदा कीड लागण्याची समस्या निर्माण होते. यामुळे धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होतेच परंतु गव्हासारखे धान्य तर खाण्यालायक देखील राहत नाही.
गव्हाला कीड लागू नये म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना देखील केल्या जातात. परंतु यामुळे देखील हवा तेवढा सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. यामुळे या लेखात आपण अशा छोट्या परंतु महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे घरात साठवलेल्या गव्हाला वर्षभर देखील कीड लागणार नाही.
या टिप्स वापरा आणि गव्हाचा किडींपासून बचाव करा
1- जेव्हा बरेच लोक बाजारामधून गहू घरासाठी आणतात. तेव्हा अशा प्रकारे बाजारातून गहू घरी आणल्यावर तो दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये चांगला वाळवून घ्यावा. त्यामुळे गव्हामध्ये जी काही आद्रता असते ती नष्ट होते व कीड लागण्याची शक्यता कमीत कमी होते.
2- तुम्ही ज्या ठिकाणी गहू ठेवणार असाल म्हणजेच साठवणूक करणारा असाल ती जागा कोरडी व सुरक्षित असावी.
3- गहू साठवण्यासाठी शक्य असेल तर सिमेंट किंवा लोखंडापासून बनवलेल्या कोठीचा वापर करावा. कुठल्याही प्लास्टिक मध्ये शक्यतो गहू ठेवू नये. असे केले तर धान्य साठवणुकीच्या कोटीला कीड किंवा उंदीर तसेच ओलावा लागत नाही.
4- गव्हाला आतून कीड लागू नये म्हणून गहू साठवताना त्यामध्ये कडुलिंबाची वाळलेली पाने ठेवावी. या कडूलिंबाच्या वाळलेल्या उग्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही.
5- बाजारामध्ये बोरिक ऍसिड मिळते व याचा वापर जर केला तर कुठल्याही प्रकारच्या धान्याला कीड लागत नाही. साधारणपणे एक क्विंटल गव्हाकरिता 400 ग्राम बोरिक ऍसिड पावडरचा वापर करावा.
6- समजा तुमच्याकडे जर लोखंडाची किंवा इतर धातूची कोठी गहू साठवणुकीसाठी उपलब्ध नसेल तर तुम्ही पोती स्वच्छ व साफ करून त्यामध्ये गहू भरावा व ही पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या कागदावर ठेवाव्यात. त्यामुळे जमिनीच्या माध्यमातून जो काही ओलावा येतो त्यापासून गव्हाचे संरक्षण होते व गव्हाला कीड लागत नाही.
अशा पद्धतीने या सहज आणि सोप्या टिप्स वापरून आपण गव्हाला कीडमुक्त ठेवू शकतो.