Ahmednagar Politics News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खा. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिलेली आहे.
अजून लंके आणि सुजय विखे यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरला गेलेला नाही. मात्र लवकरच हे दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. 18 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याला सुरुवात झाली असून या उमेदवारांच्या माध्यमातून आता लवकरच आपले अर्ज जिल्हाधिकारी यांच्या दालनात सादर केले जाणार आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुजय विखे पाटील जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत. ते शहरातील माळीवाडा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून एक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करतील आणि त्यानंतर दिल्ली गेट परिसरात सभा घेतील, मग महायुतीच्या अनेक मुरब्बी नेत्यांच्या उपस्थितीत ते आपला अर्ज जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनात सादर करणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच सुजय विखे पाटील यांचे वडील, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे आणि पुन्हा एकदा सुजय विखे पाटीलच खासदार होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्याकडून विखे कुटुंबातील उमेदवाराविरोधात नेहमीच उमेदवार दिला जातो मात्र त्यांना त्यात कधीही यश आलेले नाही. यंदाही सुजय विखे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असं म्हणत पुन्हा एकदा सुजय विखे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि केलेल्या कामाच्या जोरावर मतदार आपल्यालाच विजयी बनवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.