Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ तालुक्याचे तापमान पोहोचले ४४ अंशावर

Published on -

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून तापमानाचा आलेख वाढत चालले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तापमान चांगलेच वाढले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले अशी माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान केंद्राचे प्रभारी निरीक्षक चेतन पन्हे यांनी दिली.

अंगाची लाही लाही होत सर्व सामान्यांच्या घामाच्या धारा वाहत आहे. शहरात मात्र काही भागातील बत्ती सकाळी अकरा वाजेपासूनच गूल होती. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी किमान दिवसा तरी वीज घालवू नये, अशी मागणी होत आहे.

मागील दोन दिवसांपासून सूर्य तळपत आहे. जशी जशी वेळ वाढत जाते, तशी उष्णता वाढत असल्याने दुपारी रस्त्यावर कर्फ्यूसदृश स्थिती दिसत आहे. नागरिक घराबाहेर सुद्धा पडत नाही. अनेकांनी घरात राहणे पसंत केले आहे. नागरिकच बाहेर पडत नसल्याने काही दुकानदार, व्यापारी दुपारी आपले व्यवहार बंद ठेवत आहेत.

सकाळी दहा वाजेपासून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होत आहे. पायी अगर दुचाकीवर चालताना अंगाला चटके बसत आहे. अनेकांना आपापली कामे सकाळी व संध्याकाळी करावी लागत आहे. १४ व १६ मे रोजी अवकाळी पावसाने तडाखा दिला त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला आहे.

उकाड्यामुळे थंड पेयांची मागणी वाढली आहे. महावितरण कंपनीने गेल्या शनिवारी पावसाळ्याआधीची कामे करण्यासाठी वीज पुरवठा बंद केला होता. त्यानंतर आज १३२ केव्ही सब स्टेशनमध्ये तांत्रिक दुरुस्तीच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे सोशल मीडियावर कळवले होते. मात्र, उन्हाच्या झळा वाढत असताना वीज नसल्याने पंखे, कुलरचा सुखद आनंद घेता येत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News