कोठडीचे गज कापून दोन आरोपी पळाले; पण …

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- शहर पोलिस ठाण्याच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत दोघा सराईत गुन्हेगारांनी शुक्रवारी पहाटे कोठडीचे तीन गज कापून पलायन केले.

पहाऱ्यावरील पोलिसाला धक्का देत आरोपींनी मुख्य दारातून पलायन केले. आरोपींचा पाठलाग करत तासाभरात दोन्ही आरोपींना पकडत दिवस उजाडण्याआधीच पोलिसांनी आपली लाज राखली.

यापूर्वीदेखील याच कोठडीतून पिंट्या काळे नावाच्या आरोपीने पलायन केले होते. शुक्रवारी पहाटे पावणेचार ते चार दरम्यान ही घटना घडली.

विशाल दत्तात्रय तांदळे (२२, मंचर, जि. पुणे) आणि कलीम अकबर पठाण (२०, निंबाळे चौफुली, संगमनेर) हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून क्रमांक दोनच्या कोठडीत होते.

त्यांच्यासमवेत न्यायालयीन कोठडीतील आणखी अकरा आरोपी होते. कोठडीचे गज कापल्यानंतर या दोघांनीच पलायन केले. अन्य आरोपी तेथेच होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी आरडाओरडा करत आरोपींमागे पळण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती तातडीने बिनतारी यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीवर असलेल्या पोलिसांना देण्यात आली.

गस्तीवरील पोलिस पथकाने आरोपी पळून गेलेल्या दिशेने शोध सुरू केला. आरोपी त्यांना संगमनेर-अकोले रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवरील पुलाजवळ असलेल्या काटवनात आढळले. आरोपींना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment