Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीत अनेक भाजप नेत्यांनी विखे यांच्या त्रासाला कंटाळून लंके यांना मदत केल्याचा गौप्यस्फोट केल्याने चर्चांना उधाण आले आहे. हा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देत दोन्ही उमेदवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत येथे केली.
निवडणूक निकालाबाबत माहिती देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अघाव, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.
फाळके यांनी विरोधी उमेदवाराने सत्तेचा गैरवापर केला. पिपाणी चिन्ह एका उमेदवाराला दिले गेले. या उमेदवाराला ४४ हजार ५०० मते मिळाली आहेत. हा योगायोग नक्कीच नाही. ही मते महाविकास आघाडीच्याच उमेदवाराची आहेत.
अतिक्रमण कारवाई सूडबुद्धीने
आम्ही अतिक्रमणांच्या विरोधातच आहोत. मात्र, सुप्यासारखी अतिक्रमणे जिल्हाभरात आहेत व ती दिसत नाही. सुपे येथे सूड बुद्धीने कारवाई झाली. सामान्यांना त्रास दिल्यावर उद्रेक होतो हे सामान्यांनी दाखवून दिले असे फाळके म्हणाले.
खुनशी राजकारण
पुढे बोलताना फाळके म्हणाले की, नगर जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणात दबदबा होता परंतु, काहींनी या जिल्ह्यात चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. खुनशी राजकारण केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम केले त्यांना पराभव स्वीकारण्याची सवय नाही. यापूर्वीही त्यांनी अशाच पद्धतीने त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून काहीजण झुकले. पण, आमचा उमेदवार झुकला नाही. तो त्यांच्याविरोधात लढला आणि जिंकला.
कर्डिले, कोतकर, जगतापांना सोबत घेतल्याने विखेंचा पराभव
गाडे गतवेळी विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढविली. दिवंगत अनिल राठोड यांनी विखे यांच्यासाठी प्रचार केला. मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखेंनी विरोधात काम केले.
यावेळी त्यांनी शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप आणि कोतकर यांना सोबत घेतले. त्यामुळे त्यांना शहरातून गतवेळीपेक्षा यावेळी २० हजार मते कमी मिळाली, अशी टीका शशिकांत गाडे यांनी केली.