Ahmednagar Politics : काकांच्या यशापुढे दादांची जिल्ह्यात पकड राहील? विधानसभेला विजयाचे गणित जुळेल? कोण साथ सोडेल? जगताप, लहामटे पवारांसोबत..

Ahmednagarlive24 office
Published:
politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिला आहे. मागील काही वर्षांचा इतिहास पाहता अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आ. जगताप, आ.लहामटे, आ. काळे हे अजित पवारांसोबत गेले.

त्यामुळे शरद पवार व अजित पवार या दोघांकडूनही नगरवर वर्चस्व ठेवण्यासाठी राजकीय हालचाली सुरु झालेल्या दिसल्या. दरम्यान लोकसभेला शरद पवार गटास मिळालेली लोकप्रियता पाहता आता काकांच्या यशापुढे दादांची जिल्ह्यात पकड राहील का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभेला कसे गणित जुळवले जाईल हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे. तसेच त्यांच्यासोबत असणारे आमदार हे त्यांची अखेरपर्यंत साथ करणार का? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुतीत सर्वात कमी जागा अजित पवार यांच्या पक्षाला जिंकता आल्या.

त्यांची केवळ रायगडची जागा विजयी झाली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या प्रभावामुळे ४१ आमदार त्यांच्यासोबत गेले. या आमदारांमध्ये नगर जिल्ह्यातील संग्राम जगताप, निलेश लंके, आशुतोष काळे व डॉ. किरण लहामटे यांचा समावेश होता. लंके यांनी लोकसभेपूर्वी अजित पवार यांची साथ सोडली व ते शरद पवारांसोबत गेले.

त्यांच्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरला. कारण ते संसदेत पोहोचले. अजित पवारांना केवळ एक जागा मिळाल्याने या पक्षाचे महायुतीतील स्थान कमजोर झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विधानसभेला अजित पवारांच्या वाट्याला राज्यात किती जागा येतील याबाबतही साशंकता आहे.

त्यामुळे अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. राज्यात त्यांच्यासोबत असलेले अनेक आमदार आमच्या संपर्कात असून त्यांना माघारी परतायचे आहे असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात पवारांना किती जागा मिळणार याची उत्सुकता
आता आगामी विधानसभेला जर महायुती व महाविकास आघाडी राहिली तर विधानसभेला कोणत्या पवारांना किती जागा मिळतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. काका पुतण्यांपैकी कुणाचा पक्ष जिल्ह्यात वरचढ ठरेल हे तर येणारा काळच ठरवेल.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe