Ahmednagar Politics : लंकेंना पुन्हा पक्षात आणण्यापासून विखे-जगतापांच्या प्रचार यंत्रणेस तोडीस तोड यंत्रणा लावण्यापर्यंत.. नगरमधील ‘हा’ नेता खरा पडद्यामागील सूत्रधार

Published on -

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके निवडून आले आणि २००४ नंतर तब्बल २० वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार झाला आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाख निवडून आले होते. लंके यांची लोकप्रियता, कोविडमधील काम आदी करणे विजयास कारणीभूत तर आहेतच पण आणखीही एक राजकीय व्यक्तिमत्व होते की त्यांनीयात मोलाचा वाटा उचलला ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके.

लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळवून देण्यात जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा सिंहाचा वाटा होता. लंके अजित पवार गटात गेल्यानंतरही आम्हीच नगरची जागा जिंकणार यावर ते ठाम होते. उमेदवार निश्चित नसताना त्यांनी पक्षाचा किल्ला लढवला. लंके यांच्या विधानसभा निवडणुकीतही फाळके यांची भूमिका महत्त्वाची राहिली. कागदावरील नियोजनातही ते उजवे ठरले. त्यामुळेच मतमोजणी केंद्रावर गेल्यानंतर लंके यांनी फाळके यांचे पाय धरल्याचे सर्वश्रूत आहे.

अहमदनगर निवडणुकीत लोकसभा महाविकास आघाडीसमोर डॉ. सुजय विखे पाटील यांचे तगडे आव्हान होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विखे यांना पराभवाची धूळ चारली. विखे यांची स्वतःची प्रचार यंत्रणा आणि भाजपचे निवडणूक तंत्र यावर मात करत लंके यांच्यासोबत पायाला भिंगरी लावत फाळके यांनीही विजयश्री खेचून आणली.

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असल्यापासून लोकसभेसाठी आमदार नीलेश लंके यांचे नाव चर्चेत होते. राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट तयार झाले. लंके अजित पवार गटात सामील झाले. लंके यांचे तळ्यात मळ्यात सुरू होते. राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नव्हता.

काँग्रेस व शिवसेनेने या जागेवर दावा सांगितला होता परंतु शरद पवार ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू असतानाच जिल्हाध्यक्ष फाळके यांनी लंके यांच्याशी संपर्क वाढवला. त्यांना निवडणुकीसाठी तयार केले.

फाळके व लंके यांच्यात सुरुवातीपासूनच सुसंवाद होता. तो निवडणुकीत कामाला आला. फाळके यांनी लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडणुकीच्या कामात स्वतःला झोकून दिले. काँग्रेस व उद्धव ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी सुसंवाद साधला. गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव फाळके यांना होता. याची परिणीती निलेश लंके यांच्या विजयात झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe