Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील व्यापारी नवलमल रामचंद्र भंडारी यांची नात व सुशील भंडारी, वैशाली भंडारी यांची कन्या प्रतिक्षा भंडारी हिने चतुर्विध संघाच्या उपस्थितीत जैन भगवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा घेतल्यानंतर तिचे जैन साध्वी मोक्षदा असे नामकरण करण्यात आले आहे.
आश्वीच्या इतिहासात प्रथमच दीक्षा महोत्सवाचे आयोजन समितीने केले होते. शोभायात्रा काढून दीक्षास्थळी तिला आणण्यात आले. त्यावेळी उपाध्याय प्रवीणऋषी यांच्या सानिध्यात प्रतिक्षा यांनी जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. दीक्षा महोत्सवासाठी प्रवीणॠषी महाराज, तीर्थेशॠषी महाराज, लोकेशॠषी महाराज, कैवल्यरत्नाश्री महाराज, चंदन बालाजी महाराज, पद्मावती महाराज, साध्वी सन्मती महाराज, गौरव सुनंदा महाराज, सेवाभावी किर्तीसुधा महाराज, विश्वदर्शना महाराज, जयश्री महाराज आदींसह ४० साध्वी उपस्थित होत्या.

दीक्षापूर्वी प्रतिक्षा भंडारी म्हणालीकी, राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी महाराज तसेच अनेक साधू-साध्वींच्या आशिर्वाद मला लाभले. गुरूवर्या सुनंदा महाराज यांनी धर्म संस्कार घडविले. माता, पिता, भंडारी परिवार यांनी मला संयमीव्रत धारण करण्यासाठी अनुमोदना दिले. आज परिवार व आश्वी सोडून मी गुरूनीजींच्या सानिध्यात संयमी व्रत धारण करीत आहे. सकल जैनवासियांनी परिवाराची कन्या समजून थाटामाटात हा दीक्षा महोत्सवकरीत मला संयमी व्रतासाठी प्रेरणा दिली.
या दीक्षा महोत्सवासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे, जैन कॉन्फरन्सचेअध्यक्ष रमणलाल लुक्कड, बाबुशेठ बोरा, डॉ. संजय मालपाणी, राजेंद्र पिपाडा, नंदूशेठ भटेवरा, जलाल महाराज सय्यद, विखे कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, अॅड. शाळीग्राम होडगर, भगवानराव इलग यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातून हजारो भाविक उपस्थित होते.