Ahmednagar News : यंदा वारकऱ्यांसाठी ‘लाल परी’ येणार थेट गावात; आषाढीसाठी पाच हजार विशेष बस सॊडणार !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. तसेच हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या दुर्ष्टीने आषाढी वारीला खूप महत्व आहे. त्यामुळे आषाढी यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. दरम्यान विठू नामाचा जयघोष करत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात खास नियोजन केले आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी एसटीने ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सालाबादप्रमाणे श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून अनेक भाविक स्वतःच्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात. या भाविकांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासातदेखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

मागील वर्षी देखील एसटी महामंडळातर्फे वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या.याद्वारे यात्रा काळामध्ये १८ लाख ३० हजार ९३४ भाविक प्रवाशांची ने-आण केली होती. यंदा ही संख्या वाढेल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी जास्त बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले असून एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत. ही वारी यशस्वीपणे पार पाडावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe