Ahmednagar News : माळशेज घाटात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात नेहमीच घडत आलेल्या आहेत. यातून किरकोळ अपघातही होतात. परंतु आता तेथे दरड कोसळून मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. थेट रिक्षावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले असून यामध्ये सात वर्ष बालकाचा देखील समावेश असल्याची माहिती समजली आहे. राहुल बबन भालेराव (वय-३०) व स्वयम सचिन भालेराव (वय-०७) (मुलुंड पश्चिम, मुंबई, मुळ गाव चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे समजली आहेत.

अधिक माहिती अशी : रिक्षा चालक बबन गोपाळ भालेराव हे रिक्षाने (एमएच ०३ डिएस ३२११) त्यांची पत्नी विमल बबन भालेराव, मुले सचिन बबन भालेराव, राहुल बबन भालेराव व त्यांचा नातू स्वयम सचिन भालेराव असे एकाच कुटुंबातील पाच जण मुंबईवरून त्यांच्या मूळ गावी अर्थात गाव चंदनापुरी, ता. संगमनेर येथे घरी येत होते. सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात ते आले होते.
त्याच दरम्यान त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली. त्यामध्ये राहुल बबन भालेराव (वय-३०) व स्वयम सचिन भालेराव (वय-०७) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजली. तर यात विमल बबन भालेराव (वय-५५) यांच्या हाताला दुखापत झाली. बबन गोपाळ भालेराव (वय-५९) व सचिन बबन भालेराव (वय-४०) याना सुदैवाने काही झाले नाही.
दोन्ही मृतदेह व जखमी विमल भालेराव यांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले होते. या अपघातामध्ये मुलाचे रिक्षाचालक वडील व आणखी एक जण असे दोघे सुखरूप राहिले आहेत.