Ahmednagar News : फसवणुकीचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. सर्वसामान्य नागरिक या गोष्टींना नेहमीच बळी पडताना दिसतो. परंतु आता शिवसेना शहरप्रमुखांनाच २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) नगर शहरप्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते (वय ४९, रा. भूषणनगर, केडगाव) यांची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. जमीन खरेदीचे २५ लाख रुपये घेत साठेखत करून दिले. मात्र, ते साठेखत रद्द न करता व घेतलेले २५ लाख रुपये परत न करता संबंधित जमिनीची दुसऱ्याला विक्री करण्यात आलीय.

या प्रकरणी सातपुते यांनी सोमवारी (ता. १०) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंकुशराव जयवंतराव नागरे, जालिंदर जयवंतराव नागरे, गजेंद्र बाळासाहेब नागरे, शांताबाई बाळासाहेब नागरे, कविता संजय फुंदे, राजकुमार अंकुशराव नागरे (सर्व रा संगमजळगाव, ता. गेवराई, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींची नगर तालुक्यातील कामरगाव येथे गट नंबर ६९६ मध्ये १९ एकर शेतजमीन असून, या जमिनीच्या खरेदी व्यवहाराबाबत फिर्यादी सातपुते यांच्यासोबत बोलणे झाले होते. व्यवहार करण्याचे निश्चित झाल्यावर आरोपींनी फिर्यादी सातपुते यांना जमिनीचे साठेखत करून दिले. त्या पोटी सातपुते यांनी त्यांना २५ लाख रुपये दिले.
त्यानंतर काही दिवसांनी आरोपींनी फिर्यादी सातपुते यांना करून दिलेले साठेखत रद्द न करता व त्यांनी दिलेली २५ लाखांची रक्कम परत न करता त्यांचा विश्वासघात करून शेतजमीन नगरमधील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ येथे परस्पर खरेदी खत दस्त नं. ३५४६/२०२४ अन्वये राकेशकुमार सिंग (रा. अर्जुन पार्क, श्रद्धा विहार, इंदिरानगर, नाशिक) यांचे जमिनीचे मूळ मालक म्हणून अंकुश बाळू ठोकळ (रा कामरगाव, ता. नगर) यांना विकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.