Ahmednagar News : सध्या बाजारात नवीन मोटारसायकलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण नवीन मोटारसायकल ऐवजी सेकण्ड हॅन्ड मोटारसायकल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र अशी मोटारसायकल घेताना संबंधीतांकडून कागदपत्रांबाबत खात्री करून घ्या. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
कारण नुकताच पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला अटक केली. सदर आरोपीकडून तब्बल २४ दुचाकी जप्त केल्या आहेत. बाजारात या मोटारसायकलची जवळपास १३ लाख रुपये एवढी किंमत होते.

हे आरोपी एका जिल्हातून दुचाकी चोरून दुसऱ्या जिल्ह्यात विकत असत. शिवाय कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करून विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कृष्णा प्रकाश शिंदे (वय ५५, रा. इंदिरानगर, कोपरगाव) व श्रावण सखाराम वाघ (रा. सोमठाण, ता. येवला, जि. नाशिक) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोपरगाव शहरात मोठ्या संख्येने मोटारसायकल चोरी होण्याच्या घटना वाढत होत्या. या पार्शवभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की, श्रावण सखाराम वाघ याच्याकडेच चोरीच्या मोटरसायकली आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून श्रावण वाघ याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीमध्ये दुचाकी चोरीचा मुख्य सुत्रधार कृष्णा प्रकाश शिंदे असल्याचे सांगितले. पोलिसानी तात्काळ कारवाई करीत आरोपींना अटक केली आहे.
कृष्णा शिंदे हा कोपरगाव मध्ये चोरी केलेल्या दुचाकी तो (सोमठाणा, जोस, ता. येवला) येथे घेऊन जात होता. तेथून तो पुढे आरोपी श्रावण वाघ मदतीने चोरीच्या दुचाकी नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव या परिसरात विक्री करीत होता.
नाशिक व येवल्याच्या ग्रामीण भागात आरोपी कमी कमीत दुचाकीची विक्री करीत होते. अगदी कमी किंमतीती दुचाकी मिळत होती. म्हणून अनेकजण ती खरेदी करीत होते. कागदपत्रांबाबत दुचाकी घेणाऱ्याने विचारणा केली असता, कागदपत्र लवकरच देऊ, असे आश्वासन देत होते.
कृष्णा शिंदे यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचे २७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी १२ लाख ७७ हजाराच्या २४ दुचाकी जप्त करण्यात येथील शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईनंतर कमी किंमतीत दुचाकी मिळतात म्हणून त्या खरेदी करणाऱ्यांची मात्र धाकधूक वाढली आहे.