लोकसभा निवडणुकीत पेरलेला जातीयवाद थांबवा; महायुतीसह इतर नेत्यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू नये …?

Ahmednagar  Politics : सर्वसामान्य नागरिक व महिलांसाठी अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाभदायक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्व समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत जाण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी योगदान द्यावे. नव्याने आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा प्रचार व प्रसिद्धी करून त्याचा लाभ सर्व माता भगिनींना मिळवून द्या.महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी मनोमीलन करून बरोबर काम करावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर इतर महायुतीतील व इतर पक्षामधील नेते टीका करत आहेत. ती टीका त्यांनी त्वरित थांबवावी. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये झाली. यावेळी ते बोलत होते.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार १५ जुलै पर्यंत दक्षिण भागातील सर्व तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून संघटन मजबूत करत आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखे धडाडीचे नेतृत्व पक्षाल लाभले आहे. भविष्यात त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याचे नियोजन करा.

नगर शहर राष्ट्रवादीकडे आहेच याशिवाय कर्जत जामखेड, राहुरी, पारनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला व श्रीगोंदा मतदार संघांची मागणी पक्षाकडे करत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सज्ज होऊन आपापल्या भागाचा अहवाल पक्षाकडे लवकरात लवकर सादर करावा, असेही नाहाटा म्हणाले.

यावेळी राजेंद्र नागवडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मोठ्याप्रमाणात जातीय विष पेरले गेले आहे. हा जातीय वाद न थांबल्यास याचा दूरगामी परिणाम होतील. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जास्तीत जास्त जागांची मागणी महायुतीत लावून धरावी. लोकसभा निवडणुकीत त्यामानाने पक्षाला कमी जागा मिळाल्या होत्या. अजित पवारांसारखा खमक्या नेता आपल्याकडे असल्याचा अभिमान बाळगून त्यांचे हात बळकट करा.

बाळासाहेब जगताप म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आहे. येणाऱ्या काळत अनेक मातब्बर नेते मंडळी पक्षात येणार असल्याने ही ताकद अजून वाढणार आहे.

यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुंड, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, ज्येष्ठनेते बाळासाहेब जगताप, जिल्हा युवक अध्यक्ष नंदकुमार मुंडे, अजित कदम, पारनेर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुषमा रावडे आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी विधानसभा निवडणूकीत पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना व तालुकाध्यक्षांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe