Ahmednagar Politics : …त्यामुळेच आ.शिंदेंना विधान परिषदेतून आमदारकीची भेट फडणवीसांनी दिली, रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Ahmednagarlive24 office
Published:
pawar

Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार व आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात सुरु असणारी रस्सीखेच उभा महाराष्ट्र पाहत आहे.

त्यातच रोहित पवारांना सरकारमध्ये नेमके काय चालले आहे, हे कळत नाहीये असा टोला आ. राम शिंदे यांनी लगावला होता. आता आ. पवारांनी या वक्तव्याची सुतासह परतफेड केली आहे.

…त्यामुळेच त्यांना आमदारकीची भेट
ते मागच्या दरवाजाने आमदार झाले असून मी सरकार विरोधात बोलत असल्यानेच कदाचित त्यांना विधान परिषदेमधून आमदारकीची भेट देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली असावी असा घणाघात त्यांनी केला. मी सभागृहात काय बोलतो हे बहुतेक त्यांना कळत नाहीये व ते देखील याबाबत नीट माहिती घेत नसावेत असं दिसतेय.

आत चर्चा काय होते याबाबत बहुतेक त्यांना समजत नसावे. एमआयडीसीबाबत मी अधिवेशनात कितीदा बोललोय व त्यावर मंत्री महोदयांनी काय उत्तर दिले याबाबत त्यांनी माहिती पाहिली पाहिजे मग त्यांना काही गोष्टी कळतील असा टोला त्यांनी लगावला आहे.

नार्वेकर यांना निवेदन
कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी व्हावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला असून याबाबतचे निवेदन त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोमवारी मुंबई येथे दिले.

या नविदेनात पवार यांनी म्हटले आहे की, मतदारसंघातील युवक शिक्षण घेऊनही रोजगारासाठी परराज्यांत किंवा इतर ठिकाणी आपले घर सोडून जात आहेत.

स्थानिक भागातच रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मतदारसंघात एमआयडीसी स्थापन व्हावी, यासाठी आपण लढा देत आहोत. वेळोवेळी प्रत्येक अधिवेशनात शक्य त्या सर्व संसदीय आयुधांच्या माध्यमातून, पत्रव्यवहार, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला; परंतु शासन केवळ राजकीय कारणांसाठी सदरील ‘एमआयडीसी’चा विषय प्रलंबित ठेवत आहे.

राजकीय वजन अन् बदली जागा
आमदार रोहित पवारांनी आपले राजकीय वजन वापरून मविआ सरकारच्या काळात कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा भागात एमआयडीसी मंजुरी घेण्यात यश मिळवले होते. मात्र, त्या ठिकाणी निरव मोदी आणि इतर भूखंड माफियांची जमीन असल्याचा आरोप

राम शिंदेंनी करीत त्या जागेला विरोध केला आणि स्थगिती घेतली. तद्नंतर राम शिंदेंनी आपले राजकीय वजन वापरत महायुती काळात ती एमआयडीसी कोंभळी, थेरगाव-रवळगाव परिसरात आणण्यात यश मिळवले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe