Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व माजी खा. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
यावेळी त्यांच्यामध्ये दूध दराबाबतही चर्चा झाल्याची माहिती समजली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी जात सदिच्छा भेट घेतली.
देशाच्या गृह आणि सहकार मंत्री पदी पुन्हा एकदा विराजमान झाल्याबद्दल त्यांना विखे यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दूध दरासंदर्भात कायदा
यावेळी विखे-शाह यांच्यामध्ये दूध दराबाबतही चर्चा झाली. उसाच्या एफआरपी प्रमाणेच दुधासाठी देखील एमएसपीचा कायदा आणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
केंद्र सरकारच्या माध्यमातून दूध दरासंदर्भात लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले असल्याचेही समजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाच्या भावाबाबत जे आंदोलने सुरु आहेत त्याला न्याय मिळेल असे चित्र दिसते.
अनेक भेटी
दरम्यान राज्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण नेते असणारे दिग्गज राजकारणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यादीही अनेकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेल्या आहेत.
कांदा प्रश्नाबाबतही विखे पितापुत्रांनी अनेकदा भेटी घेत चर्चाही केलेल्या होत्या. त्यामुळे विखे-शाह यांचे वेगळेच राजकीय बॉण्डिंग तयार झाल्याचे दिसते.