Ahmednagar News : खडी वाहणाऱ्या विनाक्रंमाकाच्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी होण्याची घटना पाथर्डी-नगर रोडवर असलेल्या हॉटेल प्रशांत समोर घडली.
या दाम्पत्याचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पाथर्डीहून गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास पवार दांपत्य हे आपल्या दुचाकीवरून नगर रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली.
त्यात नितीन संजय पवार (वय २७, रा. वाघोली, ता. शेवगाव) हा तरुण मृत पावला, तर त्याची पत्नी रेणुका पवार (वय २४) गंभीर जखमी झाली. धडकेनंतर धडक दिलेले वाहनसुद्धा रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. रेणुका यांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. त्यांनी नितीन पवार व रेणुका पवार यांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले.
मात्र, उपचारापूर्वीच नितीन पवार मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर चारचाकी वाहनाचा चालक पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अपघातांचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून यात मृत पावणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. अनियंत्रित वाहने चालवणे, वेग, रस्त्यांची दुर्दशा आदी करणे या अपघातास कारणीभूत असल्याचे दिसते.