अहमदनगरमधील दोन नामांकित पतसंस्थेत मोठा अपहार, फसवणूक ! माजी जिल्हा परिषद सदस्यासह संचालकांवर गुन्हे

अहमदनगर जिल्ह्यातील दोन नामवंत असणाऱ्या पतसंस्थेतील अपहार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही पतसंस्थेतील संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
fraud

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील दोन नामवंत असणाऱ्या पतसंस्थेतील अपहार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही पतसंस्थेतील संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील पहिला प्रकार पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे, उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार, कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह १४ जणांवर पारनेर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यांतर्गत व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद बाळासाहेब तुकाराम वाळुंज (वय ६०, रा. काकणेवाडी, ता. पारनेर) यांच्यासह  सहा ठेवीदारांनी दिली आहे.

राजे शिवाजी ग्रामीण सहकारी पतसंस्थेकडे ठेवीदारांनी १३ महिन्याच्या मुदतीने ठेव प्रतिवर्ष १०.२५ टक्के व्याज दराने ठेवली होती. या ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीची रक्कम मिळण्यासाठी लेखी, तोंडी वेळोवेळी मागणी केली. मात्र पतसंस्थेने ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे उदरनिर्वाह चालविणे अवघड झाले. पतसंस्थेने वेळोवेळी प्रलोभने दाखवून ठेवीची रक्कम गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले. परंतु, आता मुदत संपल्यानंतर ठेवीची मागणी करूनही रक्कम दिली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी संस्था अध्यक्ष आझाद ठुबे, उपाध्यक्ष शमशुद्दीन गुलाबभाई इनामदार, उदयकुमार बळवंत सोनावळे, भगवंत ऊर्फ नंदकुमार चंद्रकांत ठुबे, विजय दिनकर काकडे, संतोष गुलाब ठुबे, भाऊसाहेब बबन नवले, प्रमोद नारायण लोंढे,

संतोष पोपटलाल कोठारी, किशोर दीपक शिंदे, साहेबराव किसन जेजुरकर, ज्योती तुषार ठुबे, सारिका भास्कर पोपळघट, व्यवस्थापक संभाजी सीताराम भालेकर (सर्व रा. कान्हूर पठार, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर शहरातील ज्ञानधारा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंधरा संचालकांविरुद्ध खातेदारांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका फिर्यादीची ३१ लाख ६१ हजार २७४ रुपयांची, तसेच इतर सात ठेवीदारांची ३४ लाख ३९ हजार ७८ रुपयांची असी एकूण ६६ लाख ३५२ रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मीरा पांडुरंग जायभाय यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे मी २०२२ पासून पतसंस्थेच्या सभासद आहे. चेअरमन व संचालकांनी मुदत ठेवींवर १२ टक्के व्याज देऊ असे सांगितल्याने मी त्यावर विश्वास ठेवून पतसंस्थेत ३१ लाख ६१ हजार २७४ रुपयांच्या मुदतठेव पावत्या द.सा.द.शे १२ टक्के दराने केल्या.

दरम्यान, मुलांच्या शिक्षणासाठी गरज असल्याने पतसंस्थेच्या येथील शाखेत जाऊन पावत्यांवरील व्याजाची मागणी केली, त्या वेळी मला आता कॅश शिल्लक नाही, असे सांगण्यात आले. वारंवार पाठपुराव्यानंतर संचालक मंडळाने खोटी प्रलोभने देऊन जास्त व्याजाचा परतावा देण्याचे कबूल करून, ठेवीदारांच्या पैशाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतल्याचे आणि बऱ्याच ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समजले असे त्यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी ज्ञानधारा मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बीड, शाखा श्रीरामपूर या पतसंस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे (रा. बहिरवाडी, अंबाजोगाई), व्हा. चेअरमन यशवंत वसंत कुलकर्णी (रा. बीड), तसेच संचालक वसंत शंकरराव सतले (रा. बीड), वैभव यशवंत कुलकर्णी, कैलास काशिनाथ मोहिते,

शिवाजी रामभाऊ पारसकर, रवीद्र मधुकर तलवे, आशिष पद्माकर पाटोदेकर, आशा पद्माकर पाटोदेकर, रेखा वसंतराव सतले, रघुनाथ सखाराम खारसाडे, रवींद्र श्रीरंग यादव, दादाराव हरिदास उंदरे व इतर कर्मचारी निर्मल चव्हाण, विठोबा बनक तसेच इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe