विखेंच्या लंकेंविरोधातील याचिकेवर झाली सुनावणी ! न्यायालयाने दिले ‘हे’ मोठे आदेश

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात झालेली निलेश लंके-सुजय विखे फाईट अद्यापही तेवत आहे. याचे कारण म्हणजे नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

दरम्यान आता याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी न्या. किशोर संत यांनी प्रतिवादी नीलेश लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. ही जी याचिका आहे यात नीलेश लंके निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मुख्य मागणी यात आहे.

सुजय विखे यांनी अॅड. अश्विन होन यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेतला गेला असून संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणीची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे.

निवडणुकीच्याचा ज्यावेळी प्रचार झाला त्यावेळी नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी विखे पाटलांची खोटी बदनामी होईल अशी भाषणे केल्याचेही यात म्हटले आहे. यासोबतच नीलेश लंकेंनी जो निवडणूक खर्च दाखवलेला आहे तो खर्च व प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसत नसल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

मुद्रित प्रचारातील साहित्याचा देखील यात मुद्दा उपस्थित केला असून यावर केलेला खर्च त्यांनी दाखवलेला नसल्याचे म्हटले आहे. त्यामूळे नीलेश लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झाले असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.

सुजय विखे यांनी याच काही मुद्दद्यांवर ही याचिका दाखल केली असून खंडपीठाने ती दाखलही करून घेतली आहे.