Ahmednagar Politis : विधानसभा निवडणुकीच वादळ आता घोंगावू लागले आहे. सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडी मधील पक्ष जागावाटपाचा अंदाज घेत आहेत.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यात अजित पवार गट कोणत्या जागा लढवणार याकडे लक्ष लागले आहे. आता नगर, राहुरी, पाथर्डी या तीन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार राहणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल भट्टड यांनी पत्रकार परिषदेत केला.
यासोबतच अजित पवार गटाला जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले या जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत असेही ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदार संघात डॉ. सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले आहे.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून जाहीर झालेला उमेदवार हा हमखास विजयी होणार आहे. महायुती सरकारने आणलेल्या लाडली बहिण योजने संदर्भात अजित पवार यांचा नगर जिल्हा
दौरा असून या दौऱ्यात शरद पवार गटाची अनेक नेतेमंडळी पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती भट्टड यांनी दिली. महायुती सरकारकडुन निधी वाटपात राहुरीवर अन्याय होत असल्याचा आरोप राहुरीच्या लोक प्रतिनिधींकडून झाला होता.
मात्र राहुरी हे अजित पवारांचे आजोळ असल्याने विकास कामासाठी मोठ्या निधीची लवकरच तरतूद केली जाणार आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरात तसेच राहुरी
मतदार संघात शासनाच्या निधीतून होणारी कामे निकृष्ट दर्जाची असताना राहुरीच्या लोकप्रतिनिधींकडून ठेकेदारांकडे होणारे दुर्लक्ष दुदैवी ठरले आहे. सात वर्षापासून झालेला नगरपरिषदेचा कारभार देखील जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
राहुरी ग्रामीण रुग्णालय जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयात केसचा निपटारा होत नाही, तोपर्यंत राहुरीत ग्रामीण रुग्णालय होण्याचा प्रश्न सुटणार नाही असेही ते म्हणाले.