Ahmednagar Politics : निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. परंतु जिल्ह्यातील अनेक भागात अनेक मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यामध्ये अद्यापही नाराजी नाट्य,
तर काही पक्षांतर्गत नाराजी नाट्य रंगलेलेच दिसते. आता याच पार्श्वभूमीवर अनके नेत्यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे. नाराज मंडळींना आपल्याकडे ओढून घेण्याकडे फिल्डिंग लावली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिग्गजांमध्ये झालेली भेट आता चर्चेचा विषय होऊ लागली आहे.

श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी शुक्रवारी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची अशोक बँकेमध्ये भेट घेतली. विधानसभा निवडणुकीमध्ये मुरकुटे यांनी पाठिंबा द्यावा, अशी गळ कानडे यांनी घातली आहे. यामाध्यमातून कानडे यांचा बेरजेच्या राजकारणाचा प्रयत्न सुरू आहे.
श्रीरामपूरचा विचार केला तर आमदार लहू कानडे यांची ही दुपारी टर्म असेल. परंतु यंदा त्यांच्याविरोधात काँग्रेसमधीलच सरचिटणीस हेमंत ओगले यांनी रणशिंग फुंकले असल्याचे दिसतेय.
आमदार कानडे यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून तर हेमंत ओगले व करण ससाणे यांनी युवा शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून सध्या प्रचार करताना दिसत असून दोघांनीही मतदार संघ पिंजून काढला आहे.
काँग्रेसकडून आपल्यालाच तिकीट मिळेल अशी ग्वाही दोघेही देतायेत. याच पार्श्वभूमीवर आता ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी मतदारसंघामध्ये संवाद यात्रा सुरू केली आहे.
अशातच शुक्रवारी दुपारी ते अशोक बँकेमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्याशी चर्चा केली. मुरकुटे हे लोकसेवा विकास आघाडीचे नेते आहेत. यावेळी नाना पाटील उपस्थित होते.
मुरकुटे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार केला होता. मात्र, विधानसभेबाबत अजून त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मात्र मुरकुटे यांचे फारसे राजकीय सख्य नाही.
त्यामुळे राजकीयदृष्ट्या मुरकुटे यांची मदत होऊ शकते, असा कानडे यांचा प्रयत्न आहे. अशोक कारखाना निवडणुकीतील विजयानंतर कानडे यांनी मुरकुटे यांची भेट घेतली होती.