Ahmednagar Politics : राज्यात केंद्रातील विचाराचे सरकार आले, तर निधीत झुकते माप मिळते. लोकसभेला संविधान बदलणार नाही, आरक्षण जाणार नाही, समान नागरी कायदा येणार नाही, असे आम्ही सांगत होतो. मात्र, आमच्यावर विश्वास ठेवला नाही.
अल्पसंख्याक बाजूला गेले. आम्ही पाठीशी उभे राहणारे आहोत. तुम्ही काळजी करू नका. विश्वास बाळगा, आलतू-फालतू राजकारण करणारे आम्ही नाही, शब्द दिला म्हणजे दिला, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार कोपरगाव मध्ये संवाद साधत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,
आमदार आशुतोष काळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या बाबतीतला पहाटेच्या भेटीचा किस्सा सांगितला. तसेच त्यांनी आमदारकीबाबत सूचक वक्तव्यही केले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
मी सकाळी पहाटे पाचला उठून कामाला लागतो, तर आशुतोष हा पठ्ठ्या कामासाठी मला उठवायला येतो. कामाच्या बाबतीत तो माझ्यासारखाच आहे, म्हणून त्याचे प्रत्येक काम मी करतो. अशोकरावचा मुलगा म्हणजे, माझा मुलासारखाच आहे.
त्यामुळे आशुतोषचा विकासकामाबाबत कुठलाच शब्द मी पडू देत नाही. यापुढेही पडू देणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत कोपरगावमधून महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला प्रचंड मतांनी विजयी करा.
उमेदवाराचे नाव सांगणार नाही. मात्र, एवढेच सांगतो, तुमच्या मनात जे आहे, तेच अजित पवार करेल, याबाबत काळजी करू नका, तुम्ही मात्र कमी पडू नका, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार आशुतोष काळेच्या उमेदवारीचा निर्वाळा दिला.
आ.आशुतोष काळे काय म्हणाले?
आशुतोष काळे म्हणाले की, अजित पवार हेच सर्वश्रेष्ठ नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपला सर्वांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी पाच वर्षे त्रास दिला आहे.
त्यांच्यामुळेच मतदारसंघाला तीन हजार कोटींचा निधी मिळाला आहे. आता मतदारसंघात महाराणा प्रताप व एकलव्य यांच्या स्मारकासह क्रीडा संकुलासाठी निधी द्यावा, अशी मागणी आ. काळे यांनी अजित पवार यांच्याकडे केली.