Ahmednagar Politics : प्रस्थापित साखरसम्राटांनी शेतकरी हिताची एखादी चळवळ केलेली तुम्ही कधी पाहिली का ? मात्र सत्ता आपल्यालाच व आपल्या ठराविक बगलबच्चांनाच मिळाली पाहिजे म्हणून ग्रा.पं. निवडणुकीतदेखील हे प्रस्थापित नेते सक्रिय होतात.
सत्तेचे सर्व केंद्र यांच्याच ताब्यात यांना लागतात. दोन्ही तालुक्यांत प्यायला पाणी नाही, तर काही गावांत जायला रस्ते नाहीत. वर्षानुवर्षी सत्ता भोगून मग यांनी कुठला विकास केला? त्यामुळे आता जनता हुशार झाली असून, या विधानसभेत गोरगरीब जनता यांना धडा शिकवेल,
असे प्रतिपादन जि.प. सदस्या सौ. हर्षदा काकडे यांनी केले. आज (दि.१३) रोजी शेवगाव येथे जनशक्तीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, या वेळी काकडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सरपंच पंडितराव नेमाने हे होते. या वेळी जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, रामराव गीते, नानासाहेब जाधव, संजय चेके,
गणेश वायकर, सुरेश कुटे, सचिन कोलते, विनायक देशमुख, नारायण महाराज गर्जे, शंकर भोईटे, अशोक शेळके, सुदाम पवार, प्रशांत चव्हाण, धनंजय घोडके, महेश दौंड, विनायक चौधरी, विशाल शेटे, मंगेश राठोड, भगवान डावरे, देविदास गिहें, देवराव दारकुंडे, उपस्थित होते.
या वेळी पुढे बोलताना सौ. काकडे म्हणाल्या की, १० वर्षापासून हे बिळात जाऊन बसले होते व आता विधानसभा आली म्हणून हे बाहेर निघाले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी या दोन्ही तालुक्याच्या जनतेच्या मनातून उतरल्या आहेत. कुठेही विकास झालेला दिसत नाही. फक्त यांचा स्वतःचा विकास झालाय.
या साखरसम्राटांची एकच जात आहे, ती म्हणजे काही करून सत्ता मिळवायची. यांची कोणत्याही नेत्यावर निष्ठा नाही. फक्त सौदाबाजी करत तिकीट आणायचे. खऱ्या काम करणाऱ्याला पक्षात न्याय नाही. मी कोणत्याही पक्षाच्या दारात न जाता गोरगरीब जनतेच्या दारात हजार वेळा जाईल व जात आहे. जनतेचे तिकीट महत्वाचे मानते. प्रस्थापितांच्या विरोधात एक लाट तयार झाली असून, ती लाटच यावेळी परिवर्तन घडवेल,
असेही सौ. काकडे बोलताना म्हणाल्या. अॅड. शिवाजीराव काकडे म्हणाले की, भाजप तळागाळात वाढवण्याचे काम मी केले व अचानकपणे माझे तिकिटाचा सौदा झाला. मला डावलून काँग्रेसमधून येऊन राजळेंना तिकीट मिळाले. तेव्हापासून माझा पक्षावरचा विश्वास उडाला आहे.
म्हणून ही निवडणूक सर्वसामान्यांच्या जोरावर लढणार आहोत. दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी ‘नाम फाउंडेशन’चे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते खंडोबा मैदान येथे निर्धार मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही या वेळी अॅड. काकडे यांनी केले.
यावेळी पंडितराव नेमाने, जगन्नाथ गावडे, अर्जुन खंडागळे, विनायक काटे, नारायण गर्जे, राजेंद्र उगलमुगले, भागचंद कुंडकर, विनायक देशमुख आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी तर वैभव पुरणाळे यांनी आभार मानले.