Banking Rule:- प्रत्येकजण नोकर किंवा व्यवसाय करतो आणि या माध्यमातून जो काही पैसा कमावला जातो तो सुरक्षितरित्या बँक खात्यामध्ये ठेवला जातो. बँकेमध्ये बचत खात्यात अनेक जणांचे लाखो रुपये असतात व त्यासोबत बँकेमध्ये एफडी देखील केल्या जातात.
परंतु आपण बऱ्याचदा बातम्या ऐकतो किंवा वाचतो की बऱ्याच बँका आर्थिक दिवाळखोरीत जातात व अशा बँका बुडतात. तेव्हा मात्र प्रश्न असा निर्माण होतो की ठेवीदारांच्या पैशांचे काय? आपण कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहावा म्हणून बँकांमध्ये खाते उघडतो.या मध्ये ठेवी ठेवलेला असतात.
परंतु अशा पद्धतीने जर बँक बुडाली तर मात्र आपण कष्टाने कमावलेला पैसा बुडतो का किंवा आपल्याला परत मिळतो? त्याबद्दल आपल्याला माहीत नसते. परंतु बँकेमध्ये आपण ज्या काही ठेवी ठेवलेल्या असतात त्यांच्या संरक्षणाकरिता काही नियम बनवण्यात आलेले आहेत व ते आपल्याला माहित असणे नक्कीच गरजेचे आहे.
नियमानुसार इतकी रक्कम तुम्हाला मिळू शकते
जर एखाद्या कारणामुळे कोणतीही बँक डिफॉल्ट झाली तर ठेवीदारांचे पैसे अडकून पडतात व मोठी समस्या निर्माण होते. परंतु या परिस्थितीमध्ये जर आपण नियम पाहिला तर गुंतवणूकदारांना त्यांच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी या सुरक्षित मानल्या जातात.
कारण पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीची गॅरंटी सरकार घेत असते. परंतु बँकेकडे जर तुमचे यापेक्षा जास्तीचे पैसे असतील तर ते मात्र बुडतात. कारण यामध्ये डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन अर्थात डीआयसीजीसी केवळ पाच लाख रुपयांपर्यंतच्या बँक ठेवीवर विमा गॅरेंटी देते.
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ही भारतीय रिझर्व बॅंकेची पूर्ण मालकीची उप कंपनी आहे. देशातील बँकांचा विमा उतरवण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेच्या माध्यमातून होते. म्हणजे या प्रकारचा विम्यासाठी आवश्यक रक्कम ग्राहकांकडून घेतली जात नाही. यामध्ये या विम्याचा प्रीमियम बँकेकडून जमा केला जातो.
कोणत्या बँकांना लागू होतो हा नियम?
भारतातील सर्व व्यापारी बँका जसे की, ग्रामीण बँका तसेच सहकारी व परदेशी बँकांचा देखील यामध्ये समावेश होतो. यामध्येपाच लाख रुपयांच्या विम्याचे हमी आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की, या नियमातून सहकारी संस्था बाहेर आहेत.
या अंतर्गत मिळणाऱ्या विम्यावर जास्तीत जास्त पाच लाख रुपये मिळतील व यामध्ये मुद्दल आणि व्याजाचा समावेश असतो. समजा तुमचे दोन बँकांमध्ये खाते आहे व दोन्ही बँका वेगवेगळ्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोन्ही बँकांकडून पाच पाच लाख रुपये मिळू शकतात.
तुम्ही एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खाते उघडले असतील तर असे सर्व खाती एक मानली जातात व सर्व खाते मिळून तुम्हाला जास्तीत जास्त पाच लाख रुपये मिळतात.
मुदत ठेव तसेच इतर योजनांसाठी काय आहे नियम?
या नियमांमध्ये तुम्ही जर बचत खात्यात पैसे ठेवले असतील व त्यासोबतच आरडी, फिक्स डिपॉझिट व इतर कोणत्या योजनेत जमा झालेली रक्कम असेल तर यामध्ये सर्व ठेवी जोडल्या जातात व कमाल पाच लाख रुपयांची रक्कम तुम्हाला मिळते. ही रक्कम तुम्हाला साधारणपणे 90 दिवसाच्या कालावधीमध्ये दिली जाते.