Ahmednagar News : सेतू चालकाने एका महिलेकडून कामासाठी एक हजार रुपयांची मागणी केली.. महिलेने थेट तहसीलदारांकडे धाव घेतली.. तहसीलदारांनी तक्रार ऐकून घेतली.. त्यानंतर, तहसीलदार तडक त्या महिलेसह सेतू केंद्रात.. त्यानंतर..
ही घटना घडलीये, राहुरीत. गरीब कुटुंबातील महिला आपल्या कामासाठी तहसील परिसरातील एका सेतू केंद्रात गेली असता त्या सेतू चालकाने त्या महिलेस एक हजार रुपयांची मागणी केली.
सेतू चालकाने पैशाची मागणी केल्यानंतर त्या महिलेने थेट तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे सेतू चालकाविरुद्ध तक्रार केली.
View this post on Instagram
त्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार पाटील यांनी त्या महिलेसह तडक सेतू केंद्र गाठले. व त्या सेतू चालकाला चांगलेच फैलावर घेत त्याच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.
तहसीलदार पाटील यांचा रौद्रावतार पाहून सेतू चालकाची चांगलीच बोबडी वळाली. तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून तहसीलदार यांनी आपले कर्तव्य बजावल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सर्वसामान्य जनतेच्या कामाची कायमस्वरूपी अंमलबजावणी होण्याची नागरिक आता अपेक्षा करीत आहेत.
दरम्यान तालुक्यातील नागरिकांची सर्व कामे ही तहसीलदार कचेरी मध्येच होत असतात. सर्वसामान्य जनतेकडून कामासाठी अव्वाचे सव्वा पैसे सेतू चालक घेत असतात अशी तक्रार नेहमीच येते.
सेतू चालकाच्या या मनमानी कारभाराला लगाम बसण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात कुठल्या कामासाठी किती पैसे मोजावे लागतात, याचा बोर्ड लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी द्यावेत अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
दरम्यान या तहसीलदारांची चांगलीच चर्चा रंगली आहे. तहसीलदारांनी जे काही केले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत अत्यंत आनंद निर्माण झाला आहे.नागरिक तहसीलदारांचे अभिनंदन करत आहेत.