Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अनेक मतदार संघात पक्ष कोणता असेल व उमेदवार कोणता असेल हेच अद्याप उमगत नाही अशी स्थिती आहे.
अनेक ठिकाणी उमेदवार तयार आहेत पण पक्ष कोणता हेच फिक्स नसल्याने ऐनवेळी पक्ष निवडू तयारीला लागा असे आदेशही येत आहेत. अशीच स्थिती शेवगाव पाथर्डी मध्ये आहे. दरम्यान आता माजी आ.चंद्रशेखर घुले यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
पाथर्डी – शेवगाव मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागल्याचे चित्र सर्वसामान्य मतदारांतून दिसून येत आहे. यामुळेच आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.
यावेळी फेकू राष्ट्रवादी गटाचा पराभव अटळ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले. खरवंडी कासार येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात खरवंडी आणि मालेवाडीच्या तरुणांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
दोन्ही डगरींवर हात
विद्यमान आमदार भाजपच्या मोनिका राजळे यांना पक्षांतर्गत विरोध मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. त्यातून राजळे आणि ढाकणे यांना आव्हान देत घुले यांनी आक्रमक प्रचार सुरू केला आहे.
आमदार मोनिका राजळे यांचे तिकीट कापून चंद्रशेखर घुले यांना देण्याचा मतप्रवाह भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजितदादांकडून किवा भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी घुले यांनी मोठी ताकद लावल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
ठेकेदारांना पोसण्याचे काम
घुले कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींकडून विकासाची ठोस कामे झाली नाही. तरुणांना काम मिळावे, उच्च शिक्षणाच्या सुविधा व्हाव्यात,
पिण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा याबाबत काम करण्याऐवजी कार्यकर्ते व ठेकेदारांना पोसण्याचे काम झाले. मतदारसंघातील जनता यावेळी विकासाच्या बाजूने निश्चित कौल देईल.