लोकसभेला मते मिळाले, गरज संपली म्हणून आता अकोलेकरांचे काही घेणे देणे नाही का? : खासदार वाकचौरे यांना सवाल

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे अतिवृष्टीने घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या नुकसानींचे पंचनामे करून आदिवासी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना.

खासदार वाकचौरे यांनी तालुक्यातील या शेतकर्‍यांना साधा धीर देखील दिला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी नाराज झाले असून याबाबत तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी याबाबत खासदार वाकचौरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. लोकसभेला ज्या अकोले तालुक्यातील जनतेने भरभरून मताचे दान दिल्याने या तालुक्यातून मोठ्या मताधिक्यावर शिर्डी लोकसभेत निवडून आलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज धरणे भरल्यावर जलपूजनाचा स्टंट करत आहेत .

मात्र तालुक्यातील आदिवासी व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले, पिके गेली, त्यावेळी हे खासदार कुठे होते ? त्यांना अकोलेतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देऊन पंचनामे करण्याचे आदेश देता आले नाही का? अशी टीका करत.

खासदारांना लोकसभेला मते मिळाले, गरज संपली म्हणून आता अकोलेकरांचे काही घेणे देणे नाही का? असा सवाल पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी केला आहे.

खा. वाकचौरे यांनी भंडारदरा व निळवंडे धरणाचे जलपूजन केले. यावर मेंगाळ यांनी कडाडून टीका करत भावना पत्रकारांसमोर व्यक्त केली. अतिवृष्टीने आदिवासी भागासह सर्व विभागात पिकांचे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी घराच्या पडझडीने नुकसान झाले तर पशुधनाचीही मोठी हानी झाली. एकूणच अकोले तालुक्यातील शेतकरी संकटात असताना आपले खासदार दिल्लीत रेल्वेच्या गप्पा मारत होते. त्यांना अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देता आला नाही.

नुकसानीची पाहणी करता आली नाही, मात्र तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने आज तालुक्यात येऊन धरणाचे जलपूजन करून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत असल्याची टीका केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe