Ahmednagar News : मुंबई – नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी हा महामार्ग तब्बल १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जात आहे या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल. या महामार्ग नगर जिल्ह्यातील कोपरगाव व संगमनेर तालुक्यातील काही गावातून गेला आहे.
याच समृद्धी महामार्गामुळे अनेकांचे भाग्य उजळले आहेच . मात्र या महामार्गामुळे संपूर्ण गावचेच भाग्य उजळले आहे. या महामार्गामुळे त्या गावाची ‘समृद्धी’ झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याचे कारण देखील तसेच आहे.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे हे दोन ते तीन हजार लोकवस्तीचे गाव, शेती हाच परंपरागत व्यवसाय. ना कुठल्या धरणाचे कालवे या गावात ना पर्जन्यमान चांगले.
जमीन भारी असल्याने केवळ ज्वारी व हरभरा हीच मुख्य पिके, गावात नदी आहे; परंतु तिला एखाद्या वर्षी आले तर आले पाणी नाहीतर कायम कोरडीठाक. या गावाने तालुक्यातील दोन्ही कारखान्यांना नदीवर बंधारे बांधण्याची विनंती केली; परंतु नदीत खोलवर माती व पक्के ठेवण नसल्याने तेही शक्य झाले नाही, समृद्धी महामार्ग आला आणि या भागाचे रुपडेच पालटून गेले.
जिल्ह्यातील कोपरगाव व संगमनेर या तालुक्यातील काही गावातून समृद्धी महामार्ग जात होता. त्यामुळे या महामार्गासाठी जमीन संपादनाला सुरुवात संगमनेर तालुक्यातील धोत्रेपाठोपाठ कोपरगाव तालुक्यातील भोजडे या गावापासून झाली.
या सहापदरी महामार्गाची उंची बारा ते पंधरा फूट असल्याने त्यासाठी लागणारे दगड, माती, मुरुम यासाठी गौण खनिजांचा शोध सुरू झाला. गौण खनिजांचा शोध घेत असताना या अधिकाऱ्यांनी कोळ नदी गाठली. या नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करून गौण खनिज समृद्धी महामार्गासाठी नेण्यात आले. हीच कोळनदी पुढे भोजडे गावातून वाहते.
समृद्धी महामार्गासाठी याच नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. यातून भोजडे शिवारात असलेल्या सुमारे दोन ते तीन हजार फूट लांबीच्या नदीचे सत्तर ते अंशी फूट रुंदीकरण, तर चाळीस ते पन्नास फूट खोलीकरण करण्यात आले.
गोदावरी डाव्या कालव्याचे पाणी नदीच्या पात्रात सोडण्यात येऊ लागले. यावर्षी तर पाऊसमान चांगले आहे. त्यातच जायकवाडीची भीती टळल्याने यावर्षी नदी काठोकाठ भरली आहे. तसेच या गावच्या शिवारात नगदी पिके दिमाखात डोलत आहेत.