Agri Tourism:- माणसाचे जीवन हे सध्या एका रुटीनमध्ये चालताना आपल्याला दिसून येते आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नको त्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रत्येकजण धावपळ करताना दिसून येते व यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे बरेच व्यक्ती दररोजच्या त्याच त्याच जीवनशैलीला कंटाळतात व दररोजच्या जीवनातून काही क्षण आपल्याला थोडासा वेगळ्या वातावरणात रमता यावे आणि स्वतःला रिफ्रेश करता यावे त्या दृष्टिकोनातून विचार करत असतात.
या विचारातूनच मग कुठेतरी ट्रीप प्लान करायचा विचार मनात येतो व मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला जातो. महाराष्ट्र मध्ये अनेक नैसर्गिक अशी पर्यटन केंद्र असल्यामुळे अगदी एक दोन दिवस जरी फिरायला गेला तरी तुमचा मूड रिफ्रेश होतो व तुम्ही पुन्हा जोमाने तुमच्या कामाला सुरुवात करू शकतात.
नैसर्गिक पर्यटनाप्रमाणेच महाराष्ट्रात कृषी पर्यटन देखील आता खूप नावारूपाला येत असून अशा कृषी पर्यटन केंद्रांना जरी भेट दिली तरी तुम्हाला त्या ठिकाणचे रम्य वातावरण मनाला मोहुन टाकतेच आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणच्या ग्रामीण जीवनाच्या विषयीचा अनेक गोष्टींचा अनुभव तुम्हाला घेता येतो.
त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणाच्या पारंपारिक पद्धती तसेच संस्कृतीचा देखील जवळून अनुभव घ्यायची संधी मिळते. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील तुमच्या दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीतून थोडा स्वतःसाठी वेळ काढायचा असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना भेट देऊ शकतात व महत्त्वाचे म्हणजे ही सगळी कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातच आहेत.
ही आहेत महाराष्ट्रातील प्रमुख कृषी पर्यटन केंद्रे
1- ओमकार कृषी पर्यटन केंद्र,तापोळा– जर आपण ओंकार कृषी पर्यटन केंद्राचा विचार केला तर हे तापोळा, महाबळेश्वर येथे असून या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर त्या ठिकाणी ग्रामीण पर्यटनापासून तर जल पर्यटनाचा व कृषी पर्यटनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. तापोळा हा परिसर निसर्गाने इतका समृद्ध आहे की याला मिनी काश्मीर म्हणून देखील ओळखले जाते.
2- आनंद कृषी पर्यटन केंद्र सातारा– सातारा जिल्ह्यामध्ये आनंद कृषी पर्यटन केंद्र असून या ठिकाणी जर शाळेची सहल आयोजित केली तरी खूप उत्तम ठरते. आनंद कृषी पर्यटन केंद्रामध्ये तुम्हाला पर्यावरण तसेच परिसर अभ्यासाची मुभा मिळते व विज्ञान तसेच भूगोल विषयाचे प्रात्यक्षिकांचा अनुभव विद्यार्थी जवळून घेऊ शकतात.
3- मधुबन कृषी पर्यटन केंद्र ब्रह्मपुरी, चंद्रपूर– चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी मधुबन कृषी पर्यटन केंद्र असून या कृषी पर्यटन केंद्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वैनगंगा नदीच्या काठाशी वसले आहे. तसेच या कृषी पर्यटन केंद्राच्या पलीकडे निसर्गाने समृद्ध असलेला गडचिरोली जिल्हा असून या ठिकाणी आरमोरी आणि व वघाड येथे जगभरातील पक्षी पर्यटन करून स्थलांतरित होत असतात. मधुबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये देश व विदेशातील अनेक पर्यटक भेट देतात व या ठिकाणचे रुचकर जेवण देखील खूप प्रसिद्ध आहे.
4- सीनाई कृषी पर्यटन केंद्र,सोलापूर– हे कृषी पर्यटन केंद्र सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी पर्यटन केंद्र असून सात एकर परिसरातील वसलेले हे कृषी पर्यटन केंद्र ग्रामीण व कृषी संबंधित उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी देते. कृषी पर्यटन केंद्रामध्ये अस्सल सोलापूरी खाद्य संस्कृतीने पर्यटकांना भारावून जायला होते व खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण निर्माण होते.
5- इको व्हिला कृषी पर्यटन केंद्र पुणे– पुण्यातील शिवाजीनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर वसलेले हे कृषी पर्यटन केंद्र हे पर्यटनासाठी संजीवनी आणि वरदान आहे. या ठिकाणाचे शांत वातावरण तसेच तीन एकर परिसरामध्ये पसरलेल्या बागेत नारळ तसेच आंबा, जांभूळ,
पेरू तसेच बदाम इत्यादी देशी-विदेशी झाडे असून हंगामी फळ देणारी तसेच औषधी गुणकारी असलेले झाडे येथील खास आकर्षण आहे. महत्वाचे म्हणजे या कृषी पर्यटन केंद्रामध्ये साडेतीन एकर परिसरात फळे तसेच फुले, फळे तसेच पालेभाज्या व औषध वनस्पती असे अनेक विभागातून लागवड करून पिकवले जातात व शाळेतील मुलांना शेती संस्कृती विषयी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहिती देता येते.