“आरे कारे करणारे आता बाबा दादा म्हणायला लागले, जनतेकडे न पाहणारा आता वाकायला लागला…..” विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात थोरातांची जोरदार टोलेबाजी !

Balasaheb Thorat On Vikhe Patil : गेल्या एका आठवड्यापासून नगरच्या राजकीय वर्तुळात सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहणार या चर्चा सुरू आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनीच थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय यांना फुल सपोर्ट दिला आहे. जर पक्षाने आदेश दिला तर सुजय संगमनेरमधून उभा राहणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या आठ टर्म पासून म्हणजे 40 वर्षांपासून संगमनेरचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात यांच्यापुढे सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीमुळे एक नवीन आणि तुल्यबळ आव्हान उभे राहणार आहे.

सुजय विखे थोरात यांच्या विरोधात उभे राहिले तर गेल्या आठ निवडणुकीत बाळासाहेबांना जेवढा कस लावावा लागला नसेल तेवढा येत्या निवडणुकीत लावावा लागणार आहे. दरम्यान गत काही दिवसांपासून विखे पिता पुत्र थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवत खूपच आक्रमक होऊन टीका करत आहेत. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर विखे पिता पुत्र अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आत्तापर्यंत बाळासाहेब थोरात हे विखे पिता पुत्र यांच्या टीकेवर अगदी संयमी उत्तर देत असत.

आज मात्र थोरात यांनी विखें यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार टोलेबाजी केली आहे. आज थोरात यांनी विखे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर तर दिलेच आहे सोबतच त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज राहाता तालुक्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली होती.

यावेळी त्यांनी एक लांबलचक भाषणही केले. या भाषणात त्यांनी विखे पीता पुत्रांना टार्गेट केले. आपल्या भाषणात थोरात यांनी “आरे कारे करणारे आता बाबा दादा म्हणायला लागले. जो जनतेकडे पाहताच नव्हता, तो वाकायला लागला. फोन नंबर आणि प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू झाली, आता तर कावळ्याच्या आधी पोहोचायला लागले आहे”, अशी टोलबाजी केली.

यातून त्यांनी संगमनेर मधून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सुजय विखे पाटील यांना लक्ष्य केले. थोरातांनी आगामी काळातील जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार कसा असेल आणि प्रचार कोणत्या दिशेने जाणार, त्यांच्या टारगेटवर कोण असेल याची झलकच विखेंना लक्ष्य करून दाखवली आहे. थोरात यांच्या या आक्रमक भाषणामुळे आत्तापासूनच विधानसभेचा प्रचार सुरू झाला की काय असे वाटू लागले आहे.

थोरात यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

थोरात यांनी विखे यांच्या बालेकिल्ल्यात केलेल्या भाषणात विखे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपल्या भाषणात त्यांनी गणेश साखर कारखान्याला कर्ज मिळत असेल तर अडचणी का आणता ? सभासद, कामगार सुखी होत असतील तर विघ्न का आणता ? त्यांच्या अन्नात माती का कालवता ? असे प्रश्न उपस्थित करत इतकी दुष्ट बुद्धी ठेवू नका असे म्हटले आहे. पुढे बोलताना थोरात यांनी संगमनेरमध्ये अनेक संस्था माझ्या विरोधातील आहेत, मात्र त्यांना चुकूनही मी कधी त्रास दिला नाही.

40 वर्षात मी इतरांच्या संस्थेत हस्तक्षेप केला नाही. फक्त त्यांनी चांगले काम करावे अशी माझी इच्छा असते. त्यामुळे मला कधीही कमी मते पडत नाहीत, असे म्हणत थोरात यांनी विखे यांना एका प्रकारे डिवचण्याचे काम केले. तसेच, हेतू चांगला ठेवला तर लोक पाठीशी उभे राहतात. इथल्या नेत्यांनी म्हणजेच विखे पाटील यांनी देखील तसं वागल पाहिजे, असा सल्लाही त्यांनी विखेंना दिला आहे. सुजय विखे हे संगमनेर मधून उमेदवारी करणार अशा चर्चा आहेत.

दरम्यान याबाबतही थोरात यांनी आपल्या भाषणात प्रतिक्रिया दिली आहे. थोरात म्हणालेत, सुजय विखे संगमनेरला उभे राहणार आहेत. मी स्वागत करायला तयार आहे. आमचे लोकही त्यांचे स्वागत करतील. कारण कुणाला कुठूनही लढण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. मला कोणतीच अडचण नाही, त्यांनी खुशाल संगमनेरमधून लढावे. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. थोरात यांनी, संगमनेरमध्ये येऊन तुम्ही माझ्यावर टीका करतात.

महसूलमंत्री पदाबाबत बोलता. मी महसूल मंत्री असताना काय केले याबाबत प्रश्न विचारता? तर मी सांगतो, तुमच्या आणि माझ्या कामात खूप मोठा फरक आहे. मी महसूलमंत्री होतो, पण कुणाला विनाकारण जेलमध्ये टाकले नाही. राहाता भागात असे अनेक उदाहरणं आहेत. विरोधात गेला तर खोट्या केस करतात. विरोधात बोललं तर गुंड रस्त्यावर मारतात.

त्यांनी विरोधकांना मारायला गुंड पाळलेत. हे आम्हाला जमलं नाही, हे मात्र खरं आहे. म्हणून जनता तुम्हाला नक्की धडा शिकवेन, असं म्हणत थोरात यांनी विखे पाटील यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात येऊन जोरदार समाचार घेतला आहे. त्यामुळे सध्या थोरात यांच्या या भाषणाची संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चा आहे. थोरात यांचे हे भाषण सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.