Beautiful Village In India:- प्रत्येक व्यक्ती आता दररोजच्या धावपळीच्या जीवनशैली मुळे आणि दररोजच्या त्याच त्याच कंटाळवाण्या रुटीनमुळे अक्षरशः उबगुन जातो आणि या सगळ्या कामातून स्वतःसाठी किंवा कुटुंबासोबत काही दिवस निवांत वेळ काढून तरी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणे खूप महत्त्वाचे असते व यामुळे व्यक्ती एकप्रकारे रिचार्ज होतो व परत आपल्या दररोजच्या कामांमध्ये नव्या उमेदीने लागतो.
यामुळे बरेच जण कुटुंब किंवा मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान बनवतात व निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळी भेट देतात. भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळे असून निसर्ग सौंदर्याचे खाण आपल्याला भारतातील अनेक राज्यांमध्ये बघायला मिळते व त्यामुळे पर्यटनासाठीचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत.
परंतु या निसर्ग पर्यटनस्थळांच्या ऐवजी भारतामध्ये अशी काही गावे आहेत की ते निसर्गाने समृद्ध तर आहेतच परंतु रोजच्या धावपळीच्या जीवनशैली मधून तुम्हाला निवांत वेळ हवा असेल तर तुम्ही त्या गावांना भेट देऊ शकता व आयुष्यातील काही क्षण अविस्मरणीय बनवू शकतात.
ही आहेत भारतातील निसर्गसौंदर्याने नटलेली सुंदर अशी गावे
1- तुर्तूक गाव( लडाख)- भारत पाकिस्तान सीमेवर लडाख मध्ये हे गाव असून या गावाची खास ओळख म्हणजे तिथले निसर्ग सौंदर्य आणि सभ्यता व संस्कृती हे होय. हे गाव खार डुंगला खिंडी जवळ असलेल्या उंच डोंगरांच्या मधोमध श्योक नदीच्या काठावर वसलेले असून आज देखील हे गाव पर्यटकांच्या नजरेपासून तसे पाहायला गेले तर दूरच आहे. त्यामुळेच कदाचित या गावचे निसर्ग सौंदर्य आज देखील टिकून आहे व या ठिकाणचे शांत वातावरण व साधी माणसे आपल्याला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाहीत.
2- मावलीनांग गाव( मेघालय)- मावलीनांग गाव मेघालयामध्ये असून या गावाला देवाची स्वतःची बाग असे देखील म्हटले जाते. हे गाव स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असून आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा दर्जा या गावाला देण्यात आलेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले या गावात प्लास्टिक सारख्या सर्व गोष्टींच्या वापरावर या बंदी असल्याने विशेष प्रसिद्ध आहे. तसेच या गावांमध्ये धूम्रपान करण्यावर देखील मनाई आहे. त्यामुळे या ठिकाणची हवा अतिशय शुद्ध आहे. जर तुम्ही या गावाला भेट दिली तर या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच भारावून जाल व जीवनातला सगळ्यात उत्तम असा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल.
3- जिस्पा गाव( हिमाचल प्रदेश)- हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये हे गाव असून लेह मनाली हायवेवर वसलेल्या या गावाचे निसर्ग सौंदर्य तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करते. हे गाव समुद्र सपाटीपासून साधारणपणे दहा हजार पाचशे फुट उंचीवर असून या ठिकाणी तुम्ही फक्त उन्हाळ्यामध्ये भेट देऊ शकतात. कारण हिवाळ्यामध्ये या ठिकाणी प्रवास करणे खूप कठीण होते. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य देखील मनाला भुरळ पाडणारे आहे.
4- देहेन गाव( महाराष्ट्र)- पुण्यापासून 160 आणि मुंबईपासून 115 km अंतरावर हे गाव सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले असून हिरव्यागार जंगलांनी वेढलेले असल्याने या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम असे आहे. या ठिकाणी जर तुम्हाला जायचे असेल तर तेथील स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय तुम्ही जाऊ शकत नाहीत. या ठिकाणी असलेले हिरवीगार वनराई आणि आल्हाददायक हवामान मनाला निरव शांतता देऊन वेगळीच अनुभूती देते.