शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा अवलंब होऊ लागला असून यंत्रांच्या वापराने आता शेतीमधील अनेक अवघड कामे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात करता येणे शक्य झाल्याने याचा नक्कीच फायदा हा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यामध्ये झालेला आहे. शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक योजना या शेती आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच्या असून अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीतील बऱ्याच पायाभूत सुविधांच्या उभारणी करता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
शेतीतील यांत्रिकीकरणाच्या दृष्टिकोनातून बघितले तर कृषी यांत्रिकीकरण योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतीतील उपयुक्त अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते व याच योजनेच्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट आली असून

राज्य सरकारने 2024-25 या वर्षातील राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेकरिता 27 कोटी 75 लाख रुपयांच्या निधी वितरणाला 27 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी मान्यता दिली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी महत्त्वाची यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 27 कोटी 75 लाख रुपयांचा निधी वितरणास मंजूर
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारने सन 2024-25 या वर्षाकरिता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने करिता 27 कोटी 75 लाख रुपयांचा निधी वितरणाला मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना आधुनिक यंत्र सामग्रीसाठी मोठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी देखील अनुदान मिळणार आहे.
किती मिळेल ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान?
राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करिता अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना ट्रॅक्टर किमतीच्या 50% किंवा एक लाख 25 हजार रुपयेपेक्षा जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
इतकेच नाही तर इतर शेतकऱ्यांकरिता हे अनुदान ट्रॅक्टरच्या एकूण किमतीच्या 40% किंवा एक लाख रुपये या दोन्ही रकमेंपैकी जी कमी असेल तेवढी रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार आहे. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
कशी केली जाईल लाभार्थ्यांची निवड?
राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड ही महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड होईल त्यांना या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली द्वारे थेट वितरित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदी अनुदानाचा लाभ अगदी सहजपणे आणि सुरक्षित मिळणार आहे.
अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद मात्र मिळाले 27 कोटी 75 लाख
तसे पाहायला गेले तर 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये 250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील 150 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करता यावी याकरिता कृषी संचालकांनी निधी वितरण करण्याची पत्राद्वारे विनंती केली होती व यानुसार आता त्यातील 27 कोटी 75 लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री व कृषी अवजारांचा लाभ मिळणार आहे.