Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुकीचा गुलाल खाली पडण्याआधीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असे निवडणूक आयोगाने ठामपणे सांगितले आहे. तारखा जाहीर झालेल्या नाहीत मात्र महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होण्याआधी म्हणजेच 26 नोव्हेंबर च्या आधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकी होणार आहेत. याच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे हा मतदारसंघ संपूर्ण राज्याच्या केंद्रस्थानी आला आहे. खरे तर लोकसभेच्या निवडणुका झाल्यापासून राजकारणातील चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांची अहमदनगर जिल्ह्यावरील राजकारणातील पकड ही आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती तेव्हा पक्षाची ताकद इतर पक्षांच्या तुलनेत अधिक भासत होती. मात्र मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीची ताकद दोन गटात म्हणजे शरद पवार आणि अजित दादा पवार या दोन गटात विभागली गेली. मात्र पक्ष फुटी नंतर शरद पवार यांनी जिल्ह्यातील आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वस्वी पणाला लावली आहे.
दरम्यान अकोले विधानसभा मतदारसंघातही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी अकोले विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी आपल्या पुत्रासमवेत शरद पवार यांची भेट घेतली.
यामुळे पिचड पिता पुत्र शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होणार आणि वैभव पिचड हाती तुतारी घेत आगामी विधानसभा निवडणुका लढवणार अशा चर्चा रंगू लागल्यात. याचे कारण म्हणजे गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 च्या निवडणुकीत येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे विजयी झालेत. मात्र जेव्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली तेव्हा लहामटे अजित पवार यांच्या गटात सामील झालेत.
अजित पवार गट सध्या महायुती सरकार मध्ये आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सीटिंग गेटिंग हा फॉर्म्युला स्वीकारला आहे. म्हणजे विद्यमान आमदारांच्या पक्षालाच तिकीट द्यायचे असे महायुतीने ठरवले आहे. त्यानुसार महायुतीकडून ही जागा अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास नक्की आहे.
असे झाल्यास पुन्हा एकदा किरण लहामटे येथून आपले नशीब आजमावतांना दिसणार आहेत. यामुळे गेल्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपचे वैभव पिचड यांची कोंडी होणार असे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असून याचसाठी त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली आहे.
दरम्यान, भाजपाच्या पिचड पिता-पुत्रांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाचे अमित भांगरे कमालीचे अलर्ट झाले असून त्यांनी आपल्या आई सोबत सुप्रीमो शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे या मतदारसंघाचे चित्र आता आणखीच रंगतदार बनले आहे. भांगरे मायलेेकाने पवार साहेबांची भेट घेतली खरी मात्र भेटीत काय घडलं याची माहिती त्यांनी दिली नाही.
परंतु भेट घेण्याचे कारण हे संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी भेटीत काय घडलं हे सांगितले नसले तरी आपण विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत असल्याचे सूचक विधान केले आहे. यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भेटीनंतर अमित भांगरे यांनी शरद पवार यांचा आशीर्वाद घेतला असल्याचे सांगत विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवलाय. भांगरे म्हणालेत की, अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे.
इथं गद्दारांना थारा नसतो. आमदारानी गद्दारी केली, त्यामुळे जनता त्यांना थारा देणार नाही. शरद पवार साहेबांच्या पाठीत आमदार किरण लहामटे यांनी खंजीर खुपसला आहे. म्हणून पुढील काळामध्ये जनता अकोले मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर भांगरे यांनी पवारसाहेबांनी जुलैमध्येच आशीर्वाद दिला असल्याचेही म्हटलंय. यामुळे शरद पवार हे भांगरे यांना संधी देणार की पिचड हाती तुतारी घेऊन येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.