सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, सुजयची भूमिका…..

सुजय विखे पाटील यांनी यंदा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून यासाठी विखे कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या सुजय विखे पाटील हे राहता आणि संगमनेर तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळ ठोकून बसले आहेत.

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. खरंतर संगमनेर मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा उराशी बाळगून बसलेल्या सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी नाकारली गेली असल्याची बातमी काल प्रसार माध्यमांमध्ये झळकली.

यानंतर सुजय विखे हे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत असल्याच्या बातम्या सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यात. यामुळे सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? याबाबत सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान आता याच संदर्भात सुजय विखे पाटील यांचे पिताश्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला, असं म्हणण्यापेक्षा हा मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला.

येथून थोरात यांनी सलग आठ वेळा आमदारकी भूषवली आहे. त्यांना आजतागायत या मतदारसंघात कोणीच टक्कर दिलेली नाही. यंदा मात्र संगमनेरात सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरात यांना आव्हान देताना दिसणार आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या गावी जाऊन सुजय विखे पाटील यांनी आपण यावेळी संगमनेरातून दंड थोपटणार असे म्हणत थोरात यांना आव्हान दिले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय विखे पाटील यांच्या या भूमिकेला फुल पाठिंबा दिला आहे.

मात्र, काल माध्यमांमध्ये सुजय विखे पाटील यांना भाजपाने संगमनेरातून तिकीट नाकारले आहे, अशा बातम्या समोर आल्यात. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री विखे पाटील यांनी, ‘सुजयची भूमिका चुकीची नसून, तिला माझा पाठिंबा आहे.

सुजयला उमेदवारी नाकारली या बातम्या चुकीच्या असून, ते पेरल्या जात आहेत, भाजपच्या पार्लमेंट बोर्डात याची चर्चा देखील झालेली नाही. पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या लढतीचा निर्णय त्याचा आहे. त्याच्या या निर्णयाला माझा पाठिंबा आहे,’ असे म्हणतं माजी खासदार अजूनही विधानसभेच्या शर्यतीत आहेत असे स्पष्ट केले आहे.

सुजय विखे पाटील यांनी यंदा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून यासाठी विखे कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या सुजय विखे पाटील हे राहता आणि संगमनेर तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळ ठोकून बसले आहेत.

दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या विधानामुळे सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून संगमनेरातून तिकीट मिळू शकते अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यामुळे आता बीजेपी सुजय विखे पाटील यांना येथून तिकीट देणार की सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe