Sujay Vikhe Patil News : छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ, जय शिवराय ! याच मासाहेब जिजाऊंच्या आणि छत्रपती शिवप्रभूंच्या घोषणांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “आजची तळेगावची सभा, येथे जमलेला हजारोंचा जनसमुदाय, या सभेला आलेला प्रत्येक व्यक्ती, तुम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहात की तळेगावची ही सभा संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाची नांदी ठरणारी सभा आहे.
आजची सभा गत चाळीस वर्षांची दहशत मोडून काढणारी सभा आहे. या सभेला आलेला प्रत्येक युवक त्याच्या भविष्यासाठी येथे आला आहे. या सभेला आलेला युवक उद्या मी सुजय विखे यांच्या मागे मागे उभा राहिलो तर माझ्या परिवाराला एक नव जीवनदान देऊ शकतो या आशेने येथे आला आहे,” असं म्हणतं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर चे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढवला.
काल अर्थातच 18 ऑक्टोबरला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्लात अर्थातच संगमनेरातील तळेगावात डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून युवा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्याच्या जाहीर सभेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टिका केली.
संगमनेर तालुका तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही
या मतदारसंघातील विद्यमान आमदाराने या सभेच्या माध्यमातून ऐकून घ्याव की संगमनेर तालुका तुमची दहशत मोडल्याशिवाय राहणार नाही. पुढे बोलताना विखे म्हणालेत की, “मी जेव्हा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा मला एक पत्रकार येऊन भेटलेत. तुम्हाला जर संगमनेर मधून निवडणूक लढवायची असेल तर तुमच्याकडे चार गोष्टी असायला हव्यात असे सांगितले. पहिली गोष्ट म्हणजे विद्यमान आमदार तुमचे नातेवाईक असले पाहिजेत.
यात नातं कोणतंही असो. बहीण, मेव्हणा, भाचा, पुतणे, जवाई कोणीही चालेल पण नातेवाईक पाहिजेत. मग तुम्ही नातेवाईक आहात का ? मी म्हटलं नाही बाबा. आपली काही सोयरीक जुळलीचं नाही. त्यामुळे आपलं काही नातं नाही. मग ते म्हटलेत पहिला मुद्दा काढू. आता दुसरा मुद्दा तुमच्याकडे खडी क्रशर आहे का? मी म्हटलं नाही बाबा खडी क्रशर नाही मी तर डॉक्टर माणूस आहे. मी कधी गौण खनिज केले नाही, मी कधी अवैध धंदा केला नाही.
यावर ते पत्रकार म्हणालेत की तुम्ही दोन निकषात बसत नाहीत. मग तिसरा निकष असा की तुम्ही आयुष्यात कधी कॉन्ट्रॅक्टर झाला आहात का? एखादा रस्ता केला असेल, बरं कॉन्ट्रॅक्टर नाहीत मग तुम्ही कधी वाळू वाहिली आहे का? मग मी म्हटलं नाही बुआ. वाळूही वाहिली नाही आणि आपण कधी रस्ताही केलेला नाही. ते म्हटलेत की अरे बापरे मग ही तर फार मोठी गडबड झाली. मग त्यांनी चौथा निकष सांगितला. ते म्हणालेत की तुम्ही कधीच जमिनीचा ताबा मारला आहे का ? मग मी म्हणालो जमिनीचा ताबा मारणे म्हणजे नेमके काय? ते म्हणे, इकडे आमच्याकडे जमीन खाण्याची सवय आहे.
जमीन दिसली की ताबा, जमीन दिसली की ताबा. गोरगरिबाच्या जमिनी प्रशासनाचा वापर करून ताब्यात घेतल्या जातात. मी म्हटलं पण, आपण कधीच कोणाच्या जमिनीवर ताबा केला नाही. यावर ते पत्रकार म्हणालेत की साहेब तुमचे आमच्या मतदारसंघात फार अवघड आहे. तुम्ही चारही निकषांमध्ये फिट बसत नाहीत. पण निदान तुम्ही पाचव्या निकषात तरी फीड बसणार का? यावर मी म्हणालो पाचवा निकष काय आहे. तो म्हणाला साहेब तुम्ही इथं एखादा प्रश्न 40 वर्षे लावून धरू शकता का? मी म्हटलं बाबा आपल्याला तर तासा-तासाला काम मार्गी लावण्याची सवय आहे.
यावर ते पत्रकार म्हणालेत की साहेब तुम्ही पाचही निकषांमध्ये फिट बसत नाहीत. म्हणून तुम्ही येथून निवडणूक लढवू नका. नंतर मी घरी गेलो अन एक सुपर 30 नावाचा पिक्चर बघितला. ज्यात जो डायलॉग आहे तोच डायलॉग या संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठीची टॅगलाईन ठरेल हे लिहून घ्या. राजा का बेटा राजा नही रहेगा, जो हकदार है वही राजा बनेगा,” असं म्हणतं सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर सडकून टीका केली आहे.
पुढे विखे पाटील यांनी संगमनेर ची जागा महायुती मधून भाजपाच्या वाटेला येईल. तळेगाव निमोण भागातील तरुणांनी या मातीची शान राखून परीवर्तन केले, असेच परीवर्तन आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करायचे आहे, असे आवाहन केले. चाळीस वर्षे तालुक्याला मोठी पद मिळाली. पण निधी आणता आला नाही. मात्र, ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून तळेगावला ४४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. निळवंडे धरणाचे पाणी आले.
अनेक वर्ष फक्त विखे पाटील परीवारावर टिका केली. पण साईबाबांचे आशीर्वादाने विखे पाटील कुटूबातील मुलगाच जिल्ह्याचा पालकमंत्री झाला आणि निळवंड्याचे पाणी आणून दाखवले. आता भोजापूर चारीचे पाणी सुध्दा विखे पाटीलच आणून दाखवतील असा दावा त्यांनी करताना पुढची चाळीस वर्षे तालुक्यातील युवकांच्या उज्वल भवितव्याची असतील आशी ग्वाही त्यांनी दिली.
पुढे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या उमेदवारीबाबतही भाष्य केले. डाॅ सुजय विखेना तिकीट नाकारले आशा बातम्या जाणीपुर्वक पेरल्या जात आहेत. कोणत्या सूत्रांची माहीती आहे तुम्हाला माहीत आहे. यशोधनच्या सूत्रांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करून संगमनेरचा मतदार संघ भाजपाला मिळणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यामुळे सध्या सुजय विखे पाटील यांच्या या भाषणाची नगरच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.