Vidhansabha Nivdnuk : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काटेदार लढाई होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असल्याने विधानसभा निवडणुकीत देखील याचीच पुनरावृत्ती होईल अशी आशा महाविकास आघाडीला आहे.
दुसरीकडे महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातूनच धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीत आपला परफॉर्मन्स सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
काल अर्थातच 20 ऑक्टोबरला भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुतीतील इतरही घटक पक्षांच्या माध्यमातून लवकरच उमेदवारांची नावे सार्वजनिक केली जाणार आहेत.
महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या शिंदे गटाची आणि अजित पवार गटाची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडी मध्येही जागा वाटपावर जोरदार खलबत्त सुरू आहे. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे वृत्त हाती आले आहे. यामुळे मात्र राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी सत्यजित तांबे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला का गेलेत? या उभय नेत्यांमध्ये नेमके काय राजकारण शिजतय? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे हे केंद्रस्थानी होते.
त्या निवडणुकीत त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. कारण सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतानाही सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात शुभांगी पाटील यांना ऐनवेळी महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. तसेच नाशिक पदवीधर मतदार संघात तांबे यांना भारतीय जनता पक्षाने छुपा पाठिंबा दिला होता.
यामुळे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. दरम्यानच्या काळात एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्यावर आपली नजर असल्याचे म्हटले होते. तसेच, तांबे यांच्यासारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार, अशी लोक जास्त दिवस बाहेर ठेवली की, आमची नजर त्यांच्याकडे जाते.
आम्ही चांगली माणसं गोळा करत आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. दरम्यान आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच सत्यजित तांबे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली आहे. तांबे हे फडणवीस यांच्या भेटीला गेले असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या भेटीगाठीवरून तर्क वितर्क लढवले जात आहेत.
तथापि तांबे यांची ही भेट नेमकी कोणत्या कारणांसाठी आहे ? पडद्याआड या दोन्ही नेत्यांमध्ये नेमक काय घडतय? याबाबत अजून कोणताचं तपशील समोर आलेला नाही. मात्र लवकरच या दोन्ही नेत्यांच्या भेटीची कारणे समोर येतील तेव्हा तांबे यांची नेमकी भूमिका काय हे समजणार आहे.