Shrigonda News : आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
यामुळे आता राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. अशातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मात्र एक मोठी राजकीय घडामोडी घडली आहे.

या मतदारसंघात महायुतीने भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी सौ प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या सुपुत्राने अर्थातच विक्रमसिंह पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता.
पण आधीपासूनच आमदार बबनराव पाचपुते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते आपल्या सुपुत्राच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. यामुळे पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर पाचपुते दाम्पत्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मुंबईत जाऊन त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी केली होती.
मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची ही आग्रही मागणी अमान्य केली. यानंतर पाचपुते कुटुंबियांच्या कार्यकर्त्यांनी विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याकडे पाठपुरावा केला. यानंतर प्रतिभा पाचपुते यांनी विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळाली नाही तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी आपली भूमिका जाहीर केली आणि पाचपुते दांपत्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
यानुसार आज श्रीगोंद्यात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळाली आहे. प्रतिभा पाचपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. खरंतर प्रतिभा पाचपुते आणि विक्रमसिंह पाचपुते या दोघांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता.
आता प्रतिभा पाचपुते यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याने विक्रमसिंह पाचपुते हेच महायुतीचे उमेदवार राहणार आहेत. अर्थातच महाविकास आघाडी कडून अनुराधा नागवडे आणि महायुतीकडून विक्रमसिंह पाचपुते यांच्यात लढत होणार आहे.
दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने देखील या जागेसाठी आपला उमेदवार दिला आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.