Rahuri Politics News : राहुरी विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.
गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. दरम्यान, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील वाघाचा आखाडा येथे दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यावेळी आमदार तनपुरे यांनी महायुती सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.
तनपुरे म्हणालेत की, महायुती सरकारने जाणून-बुजून मतदारसंघातील निधी रोखला. माझ्यावर ईडीची चौकशी सुद्धा लावली. मोठ्या प्रमाणावर मला त्रास देण्याचे काम विरोधकांकडून करण्यात आले. पण, कितीही संकटे आली तरी मी सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील. मी मतदार राजांशी कधीही गद्दारी करणार नाही, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे राहुरीचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक तनपुरे यांनी केले.
महायुती सरकारच्या धोरणावर तनपुरे यांची टीका
पुढे बोलताना तनपुरे यांनी, भाजप सरकारने आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबवली नाही. यामुळे तालुका ५० किलोमीटर रस्त्याला मुकला आहे.
हक्काच्या रस्त्याच्या कामासाठी सायकल रॅली तसेच वेळोवेळी आंदोलने करावी लागली आहेत. तरीदेखील प्रश्न मार्गी न लागल्याने न्यायालयात धाव घ्यावी लागली. या लढ्यानंतर अखेर कार सरकारला झुकावे लागले. मग सहा महिन्यांनंतर स्थगिती उठली व थोडी फार कामे मार्गी लागली आहेत.
आता काही लोक आपल्या कामांचे श्रेय घेत आहेत. पण, दहा वर्षे आमदार असताना लोकवर्गणी करून डीपी बसविण्याची दुर्दैवी वेळ सर्वसामान्य जनतेवर आणली. पण आपण मंत्रिपदाच्या काळात नवीन सहा सबस्टेशन तर चार सबस्टेशनची क्षमता वाढवली आहे. मात्र, ज्या योजनांमधून डीपी मिळत होती, त्या योजना आता या सरकारने बंद केल्या आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वसामान्य जनतेची कामे होणार!
यावेळी आमदार तनपुरे यांनी आपले महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या जातील. प्रामुख्याने कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, दिवसा वीज, रस्त्याच्या तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच ग्रामीण भागातील प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातील, असे आश्वासन सुद्धा दिले आहे.