कोपरगावचे आ. आशुतोष काळे मंत्री होणार ? अजितदादांच्या वक्तव्यामुळे कोपरगावात रंगली तुफान चर्चा !

Aashutosh Kale News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र, सध्या तरी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे प्रचारात आघाडीवर आहेत.

काळे यांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर काळे हे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये जात आहेत. अशातच काळे यांच्या प्रचारार्थ मतदार संघात गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार आशुतोष काळे यांच्या बाबत एक मोठे विधान केले आहे.

अजित दादा यांनी आशुतोष काळे यांना मंत्री करण्याबाबतचे संकेत दिले आहेत. गेल्या 2019 च्या निवडणुकीत काळे यांना साडेआठशेचे लीड मिळाले. पण, यंदा कोल्हे यांनी पक्षाच्या सांगण्यानुसार थांबण्याचा निर्णय घेतलाय, म्हणून त्यांचे धन्यवाद अन आता काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी कोपरगावकरांची, असं म्हणतं काळे यांना भरभरून मताधिक्य देण्याचे आवाहन अजित दादांनी केले.

एवढेच नाही तर यावेळी पवार यांनी, जेवढे अधिक लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला दिला जाईल. आशुतोष काळे यांना सुद्धा चांगली जबाबदारी दिली जाणार, हा माझा वादा आहे, असे म्हटले. यामुळे सध्या कोपरगावात महायुतीचे सरकार आले तर आशुतोष काळे मंत्री होतील अशा चर्चा रंगल्या आहेत. अजितदादा यांच्या या वक्तव्यातुन असेच संकेतही मिळत आहेत.

अजित पवार नेमके काय म्हणालेत?

अजित पवार यांनी जाहीर सभेत असे म्हटले की, कोपरगावच्या जनतेने मागील निवडणुकीत उच्चशिक्षित, जनतेसाठी काम करणारा आमदार दिलाय. त्यांनी विधिमंडळात धडाडीने काम सुद्धा केले आहे. पण, आशुतोष काळे यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. ते जे मागतात ते मतदारसंघाच्या विकासासाठी. मी पण त्यांचे सर्व हट्ट पूर्ण केले आहेत. आता कोपरगावकरांनी त्यांना ८५ हजार मतांचे लीड द्यावे. त्याचे पुढचे सर्व हट्ट मी पूर्ण करतो.

आशुतोष काळे काय म्हणालेत?

आमदार काळे यांनी प्रचार सभेत बोलताना, आपण गत 5 वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहोत. कर्मवीर शंकरराव काळे यांनी सतत जनतेची कामे करीत राहण्याची शिकवण दिली. त्याच मार्गावर मी सुद्धा वाटचाल करीत आहे.

अजित पवार यांनी मागील पाच वर्षांत भरपूर निधी दिलाय. आपले सरकार पुन्हा येणार आहेच. तेव्हा, पालखेड लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना, पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची योजना, झगडे फाटा ते संगमनेर आणि कोपरगाव ते वैजापूर या रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी मी केली आहे.

आशुतोष काळे यांना वंचितचा पाठिंबा

खरंतर, विधानसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या 20 तारखेला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. म्हणजेच आता प्रचारासाठी अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान निवडणूक जवळ आली असतांनाचं आमदार आशुतोष काळे यांची मतदारसंघात ताकद वाढली आहे.

या निवडणुकीत आशुतोष काळे यांच्या विरोधात कोल्हे नाही त्यामुळे या निवडणुकीत काळे यांचे पारडे आधीच जड आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसीम चोपदार यांनी आशुतोष काळे यांना पाठिंबा दिलाय.

काल झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत चोपदार यांनी काळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. म्हणून चोपदार यांचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने राजकीय वर्तुळात आशुतोष काळे यांची राजकीय ताकद आणखी वाढली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.