Aashutosh Kale News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही थोडीशी हटके होत आहे. या विधानसभा निवडणुकीत काळे विरुद्ध कोल्हे अशी पारंपारिक लढत पाहायला मिळतं नाहीये. यंदा या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच, महाविकास आघाडीकडून यावेळी शरद पवार गटाचे संदीप वर्पे हे दंड थोपटत आहेत. खरे तर, काळे आणि कोल्हे हे दोघेही सहकारातील नेते.
काळे आणि कोल्हे कुटुंब साखर सम्राट आहेत आणि त्यांचे राजकारणात मोठे वजन आहे. यंदा मात्र काळे यांच्या विरोधात कोल्हे नाहीत यामुळे काळे यांना यंदाची निवडणूक फारच सोपी बनली आहे, असा दावा काही राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. काळे यांचे समर्थक यंदा आशुतोष दादा हेच पुन्हा आमदार होणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान, विद्यमान आमदारांच्या माध्यमातून सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. काल, आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम सुद्धा हजर होते. यावेळी जुने रेल्वे गेटपासून प्रचार रॅलीस प्रारंभ होवून स्टेशन रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली होती.
नेहरू चौकात यावेळी जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना अभिनेते भाऊ कदम यांनी कोपरगावकरांना मोठे आवाहन केले. महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांचा हाथ आ. आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे.
आ. आशुतोषदादा यांनी केलेल्या कामावरून हे स्पष्ट दिसूनही येते. म्हणून अजितदादांचे हाथ आणखी बळकट झाले पाहिजे, यासाठी त्यांचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणे गरजेचे आहे.
कोपरगावात विद्यमान आ. आशुतोष काळे निवडून येणारचं आहेत पण त्यांना मंत्री करायचे आहे, त्यासाठी आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन केले. भाऊ कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) स्टार प्रचारक आहेत. यामुळे ते आशुतोष दादांच्या प्रचारासाठी राहता तालुक्यातील पुणतांबा येथे आले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनीही सभेला संबोधित केले.
काय म्हणालेत काळे?
आमदार काळे यांनी यावेळी बोलताना आपण कोपरगाव मतदार संघातील इतर गावांप्रमाणेचं राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील समान न्याय दिला आहे. वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा मजबुतीकरण करणे, गणेशनगर वाकडी रस्ता, वाकडी येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान विकास, जळगाव-पुणतांबा-राहता-चितळी रोड, शिंगवे-वारी रस्ता, रामपूरवाडी- पुणतांबा रस्ता-नपावाडी-पुणतांबा रस्ता चांगदेव महाराज समाधी परिसर सभामंडप व स्वच्छतागृह, वाकडी येलमवाडी-पुणतांबा, पुणतांबा रेल्वे गेट ते चांगदेव महाराज समाधी मंदिर, पुणतांबा केटी वेअर दुरुस्ती इत्यादी कामे आपण या भागात पूर्ण केली अशी माहिती काळे यांनी यावेळी दिली.
तसेच, यापुढील काळात उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असेही आवाहन आ.काळे यांनी उपस्थित मतदारांना केले. खरे तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. उद्या अर्थातच 18 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजेपासून प्रचार सभांचा झंझावात शांत होणार आहे. म्हणजेच निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.
यामुळे सर्वच उमेदवार आपल्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. काळे यांनी देखील शेवटच्या टप्प्यात जोरदार वातावरण निर्मिती केली असून सध्या तरी काळे हेच आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तथापि कोपरगाव चा पुढील आमदार कोण असेल ? हे 23 तारखेलाच अर्थातच मतमोजणीच्या दिवशीच क्लिअर होणार आहे.