Red Cow Dairy Success Story:- कुठलाही मोठा उद्योजक किंवा एखाद्या व्यवसायामध्ये उच्च यश मिळवलेले व्यक्ती जर आपण बघितले तर त्या यशामागे असलेले अफाट कष्ट आणि कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्यातून उभे राहण्याची प्रवृत्ती इत्यादी गुण दिसून येतात.
असे व्यक्ती एका रात्रीत यशस्वी होत नाहीत तर तो एक प्रदीर्घ प्रवास असतो व प्रवासामध्ये आलेल्या असंख्य अडचणी पार करत असे उद्योजक किंवा व्यावसायिक यशापर्यंत पोहोचलेले असतात.
याच मुद्द्याला धरून जर आपण रेड काऊ डेअरी चे मालक नारायण मुजुमदार यांची यशोगाथा बघितली तर ती इतर शेतकऱ्यांना आणि तरुणांना नक्कीच प्रेरणादायी अशी आहे.
दूध विकून शिक्षण घेण्याचा केला प्रयत्न
नारायण मुजुमदार यांचा जन्म 25 जून 1958 रोजी पश्चिम बंगाल राज्यातील नादिया जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे वडील बीमलेंदू मुजुमदार हे शेतकरी होते तर आई गृहिणी होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेमध्ये झाले व 1979 मध्ये त्यांनी एनडीआरआय कर्नाल येथून डेरी टेक्नॉलॉजी मध्ये बीएससी केले.
त्यांच्याकडे लागणारी फी चे 250 रुपये नव्हते म्हणून त्यांनी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात दूध विक्रेते म्हणून काम करायला सुरुवात केली व या माध्यमातून त्यांना दिवसाला तीन रुपये मिळत होते. त्यांना शिक्षणाकरिता वडिलोपार्जित जमीन देखील विकावी लागली. जेव्हा त्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर कोलकत्यात कॉलिटी आईस्क्रीम मध्ये डेअरी केमिस्ट म्हणून नोकरी करायला सुरुवात केली.
या कामांमध्ये सकाळी त्यांना पाच वाजता ट्रेन पकडून जावे लागायचे आणि रात्री घरी यायला अकरा वाजायचे. या सगळ्या रुटीनला कंटाळून त्यांनी तीन महिन्यांमध्येच नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर सिलिगुडी या ठिकाणी हिमालयन को-ऑपरेटिव्ह मध्ये देखील नोकरी करायला सुरुवात केली व या ठिकाणी त्यांनी मदर डेअरीचे महाव्यवस्थापक डॉक्टर जगजीत पुंजार्थ यांची भेट घेतली
व त्यानंतर डॉक्टर जगजीत यांनी मुजुमदार यांना कोलकत्ता येथील मदर डेअरी मध्ये नोकरी करण्यासाठी ऑफर दिली. त्यानंतर मुजुमदार यांनी मदर डेअरीमध्ये काम करायला सुरुवात केली.
परंतु १९८५ मध्ये त्यांनी ही देखील नोकरी सोडली व बहरीनमधील डॅनिश डेरी डेव्हलपमेंट कार्पोरेशन मध्ये काम करायला सुरुवात केली व तिथूनही तीन महिन्यांनी ते कोलकत्याला घरी परत आले व पुन्हा मदर डेअरीमध्ये काम करायला लागले.
अशा पद्धतीने सुरू केला 1997 मध्ये स्वतःचा पहिला शीतकरण संयंत्र युनिट
1995 मध्ये मुजुमदार हे हावडा येथील ठाकर डेअरी उत्पादनांचे महाव्यवस्थापक बनले. यावेळी त्यांना निदर्शनास आले की स्थानिक व्यापारी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अगदी कवडीमोल भावाने दूध खरेदी करतात व मध्यस्थी व्यक्ती दूध उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय कमी पैसे देतात व कंपनीला ज्यादा दराने दूध विकून जास्त नफा मिळवतात.
त्यानंतर मात्र नारायण मुजुमदार यांनी शेतकऱ्यांना दुधाशी संबंधित व्यवसाय समजावून सांगायला सुरुवात केली व स्वतः सायकल वरून शेतकऱ्यांकडे दूध विकत घ्यायला ते जायला लागले. अशा पद्धतीने नारायण मुजुमदार यांच्या कामावर खुश होऊन ठाकर यांनी त्यांच्यासाठी शीतकरण संयंत्र उभारले व यानंतर मात्र नारायण मुजुमदार यांनी मागे वळून पाहिले नाही.
1997 मध्ये नारायण मुजुमदार यांनी दहा लाख रुपयांचे गुंतवणूक करून स्वतःचा चीलिंग प्लांट उभारला. 2000 यावर्षी त्यांनी ठाकर यांच्याकडून चिलिंग युनिट विकत घेतले व त्याच वर्षी त्यांनी पहिला दुधाचा टँकर विकत घेतला आणि प्रोप्रायटर शिप फर्मचे रूपांतर भागीदारी महामंडळात केले. 2003 मध्ये मुजुमदार यांनी ठाकर डेअरी देखील सोडली आणि स्वतःची रेड काऊ डेरी नावाची कंपनी सुरू केली.
रेड काऊ डेअरीचा व्यवसाय आहे 800 कोटींपेक्षा जास्त
आज जर आपण नारायण मुजुमदार यांच्या रेड काऊ डेअरीचा व्यवसाय बघितला तर तो 800 कोटींपेक्षा जास्त असून कंपनीचे तीन प्रोडक्शन युनिट आहेत.
त्यांच्या या कंपनीमध्ये 1000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला असून पश्चिम बंगाल राज्यातील तीन लाख पेक्षा जास्त शेतकरी त्यांच्या या फर्मशी जोडले गेले आहेत. अशाप्रकारे अखंड मेहनत आणि कष्टाने नारायण मुजुमदार हे रेड काऊ सारख्या प्रसिद्ध अशा डेअरी कंपनीच्या यशापर्यंत पोहोचले आहेत.