देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आ. प्रा. राम शिंदे यांना मोठी जबाबदारी मिळणार ! विधान परिषदेचे सभापती पद किंवा मग…..

राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे नेते आहेत. त्यामुळे 2019 ला विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर करून घेतले होते. दरम्यान विधान परिषदेची आमदारकी असतानाही त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत जामखेड मधून पुन्हा एकदा संधी देखील देण्यात आली होती.

Tejas B Shelar
Published:

Ram Shinde News : काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच, काही दिग्गज नेत्यांना डच्चू देखील मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील फडणवीस मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे.

मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळात गेले असल्याने भाजपा आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणार अशा चर्चा सुरू आहेत. खरेतर भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे अलिखित धोरण गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

यामुळे मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर बावनकुळे यांच्या ऐवजी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला जाऊ शकतो, अशा चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदासाठी काही नावे देखील चर्चेस आली आहेत.

मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेल्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली जाणार अशी शक्यता आहे. या पदासाठी रवींद्र चव्हाण आणि डॉ. संजय कुटे यांची नावे आघाडीवर आहेत. यात रवींद्र चव्हाण यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

गेल्या शिंदे सरकारमध्ये चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. विधानसभा निवडणुकीत कोकणात भाजपाला चांगले यश मिळाले असून या यशात रवींद्र चव्हाण यांचा मोठा खारीचा वाटा होता. दुसरीकडे डॉक्टर संजय कुटे हे बहुजनांचे नेतृत्व करतात आणि फडणवीस यांचे निकटवर्तीयं नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

यामुळे चव्हाण यांना संधी मिळाली नाही तर कुटे यांना या पदासाठी संधी मिळू शकते. या दोन्ही नेत्यांसोबतच कर्जत जामखेडचे माजी आमदार, विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.

राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे नेते आहेत. त्यामुळे 2019 ला विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पुनर्वसन विधान परिषदेवर करून घेतले होते.

दरम्यान विधान परिषदेची आमदारकी असतानाही त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत जामखेड मधून पुन्हा एकदा संधी देखील देण्यात आली होती. मात्र या निवडणुकीतही राम शिंदे यांना कर्जत जामखेड मधून पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र असे असतानाही आता राम शिंदे यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी सोपवणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेचे सभापती पद हे भाजप आपल्याकडे खेचून आणू शकते आणि सभापतीपदी रामा भाऊंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

मात्र जर काही कारणास्तव सभापतीपदी रामा भाऊंची वर्णी लागली नाही तर त्यांना भारतीय जनता पक्षाकडून प्रदेशाध्यक्षपदी बसवले जाऊ शकते अशाही काही चर्चा आता नव्याने सुरू झाल्या आहेत. यामुळे भारतीय जनता पक्ष राम शिंदे यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe