Expressway Built Technology:- सध्या भारतामध्ये अनेक प्रकारचे रस्ते प्रकल्पांचे कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी या महामार्गांवर बोगद्यांचे तसेच पुलांचे कामे देखील सुरू आहेत.या सगळ्या रस्ते प्रकल्पांच्या कामांचा विचार केला तर यामध्ये सध्या प्रगत अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्यामुळे अनेक अशक्य गोष्टी देखील या प्रकल्पांमध्ये शक्य झाल्याचे दिसून येत आहे. भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन प्रयोग या क्षेत्रामध्ये केले जात असल्याचे आपण गेल्या काही वर्षापासून बघत आहोत.
त्यातीलच एक प्रयोगाचा भाग म्हणून जर आपण पाहिले तर देशातील पहिला बायो-बिटूमीनचा वापर केलेला पहिलाच महामार्ग बांधण्यात आला असून नुकतेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील नागपूर ते मानसर बाह्यवळण प्रकल्पात महामार्ग क्रमांक 44 या ठिकाणी महामार्ग उभारताना बायो बीटूमिनचा प्रयोग करण्यात आलेला आहे. हे तंत्रज्ञान प्राज इंडस्ट्रीज च्या माध्यमातून विकसित करण्यात आले असून यामध्ये कच्च्या लीग्नीनचे बायो बिटूमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
हा प्रयोग खूप महत्त्वाचा असून यामुळे भारताची चार ते साडेचार हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होऊ शकते असा देखील एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतात शाश्वत आणि पर्यावरण पूरक रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या दिशेने एक परिवर्तन घडून येईल हे मात्र नक्की.
प्राज इंडस्ट्रीने विकसित केले आहे हे तंत्रज्ञान
हे तंत्रज्ञान प्राज इंडस्ट्रीच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. यासोबतच कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च व सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने व प्राजच्या माध्यमातून लिग्निन आधारित बायो बिटूमिन नमुन्याची चाचणी करण्यात आली होती
व या पारंपारिक बीटूमिनमध्ये पंधरा टक्के बायो बीटूमिनचे मिश्रण करण्यात येते व याचा वापर करून गुजरात मधील हलोल येथे प्राजने सेवा रस्ता देखील तयार केला आहे
व या तयार रस्त्याचे दोन वर्ष आणि तीन पावसाळी हंगामामध्ये निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणानंतर सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने समाधानकारक असे निष्कर्ष नोंदवले व त्या ठिकाणी ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर नागपूर ते मानसर या प्रकल्पाच्या बांधकामात हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
बिटूमीन म्हणजे नेमके काय असते?
कच्च्या तेलाचे विभाजन केल्यामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे काळे चिकट मिश्रण म्हणजेच बिटूमीन होय. रस्त्यांच्या बांधणीमध्ये सर्व घटकांना एकत्रित बांधण्याचे काम बिटुमिन करते. याबाबत जर आपण पेट्रोलियम मंत्रालयाचे आकडेवारी बघितली तर वर्ष 2023-24 मध्ये बीटूमीनचा वापर 88 लाख टन होता
व या चालू आर्थिक वर्ष म्हणजेच सन 2024-25 मध्ये तो 100 लाख टनांपर्यंत जाईल अशी एक शक्यता आहे. या सगळ्या वापरापैकी 50% बिटूमीन आयात केले जाते.
त्यामुळे भारताला वर्षाला 25 ते 30 हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च करावा लागतो. परंतु आता भारतामध्ये लीग्नन आधारित बायो बिटूमीनचा पर्याय उपलब्ध झाला असल्याने नक्कीच देशाचे कोट्यावधी रुपये वाचतील एक शक्यता आहे.