Organic Jaggery Production Business:- एखादी गोष्ट करण्याची मनामध्ये असलेली इच्छा व ती इच्छा किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे कष्ट तसेच प्रयत्नांमधील सातत्य आणि कितीही विपरीत परिस्थिती आली तरी तिला तोंड देऊन त्यातून मार्ग काढून यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची असलेली उर्मी जर व्यक्तीमध्ये असली तर कुठल्याही क्षेत्रात व्यक्ती यशस्वी होत असतो.
या मुद्द्याला धरून जर आपण बघितले तर व्यवसायाच्या बाबतीत अनेक व्यवसायांमध्ये आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचलेले उद्योजक किंवा व्यावसायिक दिसून येतात. यामध्ये ज्याप्रमाणे पुरुषांचे प्रमाण आहे तितक्याच महिला देखील आता एक पाऊल पुरुषांच्या पुढे आहेत.
शेती क्षेत्र व शेतीशी निगडित असलेले व्यवसाय यामध्ये देखील आता महिला अग्रेसर असून अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये महिलांनी यश मिळवले आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण लातूर जिल्ह्यातील खोपेगाव येथील रोहिणी कोल्हे या महिला शेतकऱ्याचे उदाहरण घेतले तर ते इतर महिलांना आणि शेतकऱ्यांना देखील प्रेरणादायी आहे. त्यांनी स्वतःचा सेंद्रिय गुळ निर्मिती उद्योग सुरू केला आहे व त्यातून ते लाखो रुपयांची उलाढाल वर्षाला करतात.
सेंद्रिय गुळ निर्मिती उद्योगातून साधली आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यातील खोपेगाव येथील रहिवासी असलेल्या रोहिणी कोल्हे यांनी त्यांच्या पाच एकर शेतीमध्ये ऊस लागवड केली व त्या उसाचे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने नियोजन केले व त्यापासूनच सेंद्रिय गूळ निर्मितीचा उद्योग मागच्या दहा वर्षांपूर्वी उभा केला.
प्रचंड प्रमाणात कष्ट घेऊन त्यांनी हा व्यवसाय गेल्या दहा वर्षापासून यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. मेहनत आणि योग्य नियोजन ठेवले तर कुठलाही व्यवसायामध्ये यशाचे शिखर गाठता येते हे रोहिणी कोल्हे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आज सेंद्रिय गुळ उत्पादन आणि त्याची विक्री या माध्यमातून रोहिणी ताई वर्षाला आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
त्यांनी जवळपास तीन एकर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने उसाची लागवड करून सेंद्रिय गूळ निर्मिती व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचवला आहे.
त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना त्यांचे पती तसेच मुले व सासऱ्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला असून 2014 पासून उभारण्यात आलेल्या या गुळ व्यवसायामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे मार्केट टिकवून ठेवले आहे. सध्या ते त्यांचा तयार गूळ पुणे तसेच मुंबई, छत्रपती संभाजी नगर व सोलापूर या ठिकाणी विक्री करतात.
रोहिणी ताईंच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की, जे लोक म्हणतात की शेती परवडत नाही व या विचारातून अनेक जण शेतीपासून दूर जातात.
अशा लोकांना रोहिणी ताईंनी दाखवून दिले आहे की शेतीमध्ये जर योग्य नियोजन ठेवले व शेतीसंबंधीत व्यवसायांमध्ये जर तुम्ही पडलात व कष्ट घेऊन असे व्यवसाय यशस्वी केले तर शेती देखील परवडणारी आहे व त्यातून लाखो रुपये कमवता येऊ शकतात.