Har Ghar Lakhpati Scheme:- स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेचे कोट्यावधी ग्राहक भारतात आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी कायमच वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना राबवल्या जातात. त्याच अनुषंगाने सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने हर घर लखपती नावाची एक रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आवर्ती ठेव योजना आणली असून ही योजना अतिशय महत्त्वाची आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आणलेली ही योजना अशा लोकांसाठी आहे जे प्रत्येक महिन्याला आपल्या कमाईतून थोडीशी बचत करून मोठा निधी तयार करण्याची इच्छा बाळगून असतात. या योजनेअंतर्गत तुम्ही एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे रक्कम अगदी सहजपणे आणि कमीत कमी गुंतवणुकीतून उभी करू शकतात.
कसे आहे या योजनेचे स्वरूप?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेमध्ये तुम्ही तीन ते दहा वर्षाच्या कालावधी करिता महिन्याला बचत करू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही तीन वर्षं करिता प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये जमा केल्यास योजना मॅच्युअर म्हणजेच परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला एक लाख रुपये मिळतात.
तुम्ही जर दहा वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुमच्या महिन्याचा हप्ता 591 पर्यंत कमी होतो. जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून मिळणारे व्याज पाहिले तर त्याचे दर सामान्य ग्राहकांसाठी 6.75 टक्के इतके आहेत.
तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25% पर्यंत व्याज या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत असून जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आणि वरिष्ठ कर्मचारी असतील तर त्यांना आठ टक्के पर्यंत व्याजाचा फायदा मिळणार आहे.
परंतु या योजनेत गुंतवणूक करताना कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की आयकर नियमानुसार या योजनेवर टीडीएस कपात लागू आहे.
लहान मुलांना देखील उघडता येते खाते
दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची मुले देखील या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर त्यांना सही कशी करायची हे माहित असेल ते मुले योजनेत खाते उघडू शकतात व जी मुले सही करू शकत नाही त्यांच्यासाठी त्यांचे पालक किंवा पालकांच्या माध्यमातून खाते उघडले जाऊ शकते.
हप्ता भरण्यास वेळ लागला तर दंड लागतो का?
या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आंशिक हप्ता भरण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. परंतु हप्ता भरायला जर वेळ लागला तर त्यामध्ये दंड लागतो व 100 च्या हप्त्यावर दीड रुपये ते दोन रुपयापर्यंत दंड लागू शकतो व सलग सहा हप्ते जमा केले नाही तर खाते बंद होते व जमा केलेली उर्वरित रक्कम बचत खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल.
कसे उघडाल या योजनेत खाते?
या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन आवश्यक ते कागदपत्रे जमा करू शकतात. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम आणि गुंतवणुकीचा कालावधी निवडावा लागतो.
या आधारावर तुमचा महिन्याचा हप्ता ठरवला जातो. अशा पद्धतीने एसबीआयचे हर घर लखपती योजना लहान गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे. त्या योजनेमुळे बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन मिळतेच परंतु लहान रकमेतून एक मोठा निधी उभारण्याचा मार्ग देखील मोकळा होतो.