डिजिटल अरेस्ट करत निवृत्त अधिकाऱ्याला २.२७ कोटींना गंडवले ; मनी लाँड्रिंगची भीती दाखवत उकळले पैसे

Mahesh Waghmare
Published:

१५ जानेवारी २०२५ रांची : झारखंडमधील कोळसा कंपनीतील एका निवृत्त अधिकाऱ्याला ११ दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्ट करत सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीने त्यांच्या कडून २.२७ कोटी रुपये उकळल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.सायबर गुन्हेगारांनी फोनवर अधिकारी असल्याचा बनाव करत आणि मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगवासाची भीती दाखवत निवृत्त अधिकाऱ्याला गंडवले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासानुसार गंडा घालणारी सायबर टोळी ही महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले.डिजिटल अरेस्टला बळी पडलेले अधिकारी हे कोल इंडिया कंपनीतून निवृत्त झालेले आहेत.

रांचीतील रहिवासी असलेल्या या अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार १० डिसेंबर २०२४ रोजी त्यांना एक फोन आला होता.फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव अभिराज शुक्ला असल्याचे सांगत आपली ओळख ट्राय (भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण) चे अधिकारी म्हणून करून दिली.

यानंतर अधिकाऱ्याला त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून भ्रामक जाहिराती आणि मेसेज पाठवले जात असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्याने ही गोष्ट नाकारली. पण बनावट अधिकाऱ्याने कदाचित त्यांच्या दस्तावेजाचा वापर करून दुसऱ्या सीम कार्डवरून सायबर गुन्हेगार असे करत असल्याचे त्यांना सांगितले.

या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून निवृत्त अधिकाऱ्याला अटकेची धमकी देण्यात आली.तसेच निर्दोष असल्यास तपासात सहकार्य करण्याच्या नावाखाली त्यांना जाळ्यात अडकवण्यात आले.यादरम्यान मोबाइल फोनवरून विविध अधिकाऱ्यांसोबत बोलणे करून देत त्यांना विश्वासात घेतले.

यानंतर जवळपास ११ दिवसांपर्यंत डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले.गुन्हेगारांना पकडण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्याची गरज असल्याचे सांगून अधिकाऱ्याला विविध खात्यांवर पैसे टाकण्यास भाग पाडण्यात आले.

आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे लक्षात येईपर्यंत अधिकाऱ्याचे जवळपास २.२७ कोटी रुपये भामट्यांनी उडवले.याप्रकरणी अधिकाऱ्याने रांचीतील सीआयडी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe