१५ जानेवारी २०२५ मुंबई : पानिपतच्या युद्धातून ‘एक हैं, तो सेफ हैं’ हे शिकणे आवश्यक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची देव, देश आणि धर्म रक्षणासाठी एकत्र येण्याची शिकवण आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे,असे प्रतिपादन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथील ‘२६४ व्या शौर्य दिवस समारंभात केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर स्वराज्यासाठी लढणाऱ्या हिंदवी स्वराज्याची सेना आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये १७६१ साली झालेल्या भीषण युद्धाच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी, मराठ्यांच्या रक्ताने, हौतात्म्याने पावन झालेल्या पानिपतच्या या वीरभूमीला अभिवादन देखील केले.
पानिपतच्या या मोहिमेत मराठ्यांचा पराभव होण्याचे कारण म्हणजे सर्व राजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी एक होऊ शकले नाहीत, हे सांगताना ‘एक हैं, तो सेफ हैं’चे महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. या मोहिमेत जरी मराठे पराभूत झाले तरीही पुढील १० वर्षांतच महादजी शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्ली जिंकून मराठ्यांनी स्वराज्याची स्थापना केली,याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
विकसित भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वांनी एक होऊन देश विघातक शक्तींचा सामना करण्याची गरज देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
पानिपतच्या शौर्य भूमीवर महाराजांचा भव्य पुतळा उभारणार
पानिपतच्या शौर्यभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून भव्य पुतळा उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शौर्य स्मारकासाठी आवश्यक जमिनीच्या अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अद्याप मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन योग्य मूल्य देऊन जमीन अधिग्रहित करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.