बीड प्रकरणातील दोषींना थारा दिला जाणार नाही : अजित पवार

Sushant Kulkarni
Published:

१५ जानेवारी २०२५ मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.या घटनेत जे कोणी दोषी असतील, त्यांना थारा द्यायचा नाही,असे राज्य सरकारने मनोमन ठरवले आहे.त्यामुळे या प्रकरणात कुणीही दोषी असेल आणि त्याचे धागेदोरे तपासात मिळाले तर त्यांना आम्ही सोडणार नाही.

तसेच गुन्हेगारी प्रकरणात मकोका लावला जाणे ही कायद्याची प्रक्रिया असून, त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.सरकारचा दृष्टिकोन पारदर्शक आहे.गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणाचाही निकटवर्तीय असो,त्याच्यावर कायद्याप्रमाणेच कारवाई होईल,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.यावेळी पवार म्हणाले,कायद्यापुढे सर्व समान आहेत.

सरकारने न्यायसंस्थेच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही.पोलीस व न्यायालय स्वतंत्रपणे काम करत आहेत.या प्रकरणातील तपास प्रामाणिकपणे होईल, याची मी खात्री देतो.दोषींना शिक्षा मिळाल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही.

या प्रकरणावर होणाऱ्या राजकीय चर्चावर बोलताना पवार म्हणाले,अशा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये राजकारण टाळायला हवे.गुन्हेगारी घटनांवरून समाजात तणाव निर्माण होण्याऐवजी शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्वांनी जबाबदारीने वागावे, मकोका लागू करणे ही गंभीर गुन्ह्यांविरोधात कडक कारवाईसाठीचा भाग आहे. तपास यंत्रणांनी जमा केलेल्या पुराव्यांवरच हा निर्णय घेतला गेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe