श्रीगोंदा : ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण येथील दोन्ही कारखान्यांकडे गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार १० रुपये अंतिम बाजारभाव देणार असल्याचे ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी जाहीर करत ऊस बिलापोटी प्रतिटन २ हजार ९०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केला असल्याची माहिती दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात बोत्रे यांनी चालू गाळप हंगामात ओंकार ग्रूपच्या अधिपत्याखालील तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर व देवदैठण येथील ओंकार शुगर हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत. आम्ही यावर्षी गौरी शुगर (हिरडगाव) येथे दहा लाख मेट्रिकटन तर ओंकार शुगर (देवदैठण) येथे तीन लाख मेट्रिकटन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे.
दोन्ही कारखान्यांनी ३१ डिसेंबर अखेर २ लाख ९७ हजार २७१ मेट्रिकटन ऊसाचे गाळप केले असून पहिल्या हप्तयापोटी ८६ कोटी २० लाख ८७ हजार ४६७ रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक. खात्यांवर वर्ग केली आहे.
उर्वरित ऊस बिल व साखर देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार आहोत. आम्ही नेहमीच ऊसाला चांगला बाजार भाव देऊन शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांनी ऊसाच्या बाजारभावाबाबत कोणतीही शंका न बाळगता जास्तीत जास्त ऊस ओंकार ग्रुपला देण्याचे आवाहन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे व व्यवस्थापक रोहिदास यादव यांनी केले आहे.