8th Pay Commission Salary :- कित्येक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी चातकासारखी वाट पाहत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अखेर आज केंद्र सरकारने मंजुरी दिली व या आयोगाच्या शिफारसी 2026 पासून लागू केल्या जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची माहिती अशी दिली की 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला व त्याच्या शिफारसी 2026 पर्यंत सुरू राहतील व त्यानंतर आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतील.
आपल्याला माहित आहे की, केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करत असते. सध्या कर्मचाऱ्यांना जे काही वेतन किंवा भत्ते दिले जात आहे ते सातव्या वेतन आयोगा अंतर्गत दिले जात आहेत व त्याचा कार्यकाल 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार असून 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा आहे.
आठवा वेतन आयोगानंतर पगारात काय फरक पडेल ?
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे जवळपास 18 लेवल म्हणजेच स्तर आहेत. यामध्ये लेवल एक कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18000 रुपये आहे व 1800 रुपये ग्रेड पे आहे. आठवा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर ते 34560 केले जाऊ शकते. इतकेच नाही तर केंद्र सरकारमध्ये, कॅबिनेट सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना लेवल 18 अंतर्गत कमाल मूळ वेतन अडीच लाख रुपये मिळते व ते 8 व्या वेतन आयोगानंतर अंदाजे 4.8 लाख रुपये पर्यंत वाढू शकते.
आठव्या वेतन आयोग अंतर्गत पगार वाढल्याने पेन्शन किती वाढेल?
जानेवारी 2026 मध्ये आठवा वेतन आयोग जर लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ३४५६० रुपये असेल असा एक अंदाज आहे. जर आपण यामध्ये वर्ष 2004 जोडले तर 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली बॅच 2029 मध्ये रिटायर होईल.
त्यानुसार आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लेव्हल एक कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ३४५६० रुपये झाला तर त्याच्या रकमेच्या 50% म्हणजे 17 हजार 280 रुपये अधिक महागाई सवलत अशा पद्धतीची पेन्शन स्वरूपात रक्कम निवृत्तीवेतनधारकाला मिळेल.
प्रमोशन म्हणजेच पदोन्नती आणि इतर नियमानुसार ही पातळी वेळोवेळी वाढत राहते व त्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून जास्त रक्कम मिळेल. तसेच लेवल 18 कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 4.80 लाख रुपये असेल व त्यांना 2.40 लाख रुपयांच्या 50% रक्कम+ महागाई सवलत पेन्शन म्हणून दिली जाईल.
आठव्या वेतन आयोग अंतर्गत पगाराची निश्चिती कशी ठरणार?
एक जानेवारी 2026 पासूनच आठवा वेतन लागू होईल अशी एक शक्यता आहे व हा आयोग लागू झाल्यावर फिटमेंट फॅक्टर च्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा केली जाईल. म्हणजेच सातव्या वेतन आयोग अंतर्गत आता सध्या वेतन सुधारण्यासाठी 2.57 फॅक्टर लागू केला गेला आहे. परंतु काही मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर आठवा वेतन आयोगानंतर सरकार किमान 2.86 च्या उच्च फिटमेंट फॅक्टरची निवड करू शकतो व त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.